हिंदुस्थानींच्या अमेरिकेतील नोकऱ्या वाचणार, ट्रम्प प्रशासनाने व्हिसा निर्बंध केले शिथिल

496

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत लागू असलेले व्हिसा निर्बंध अखेर काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसाच्या नियमावलीत सूट दिली आहे. या निर्णयाने हिंदुस्थानसह इतर देशांतील नागरिकांच्या अमेरिकेच्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्या काचणार आहेत. त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. व्हिसाधारकाच्या पत्नी आणि मुलांनाही प्रवास करता येणार आहे.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागारांनी गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली. व्हिसाधारकाने अमेरिकेतील आधीच्या नोकरीसाठी अर्ज केला तर त्याला नियमांतील सूटचा मोठा फायदा मिळणार आहे. तांत्रिक विभागातील तज्ञ, वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापक तसेच इतर कर्मचाऱयांनाही प्रवासाला मुभा दिली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जूनला एच-1 बी व्हिसा निलंबित केल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा हिंदुस्थानसह अन्य काही देशांना मोठा झटका बसला होता. आता अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रशासनाने व्हिसा निर्बंध शिथिल केले आहेत.

कोरोना योद्धय़ांनाही अमेरिकेत प्रवेश मिळणार

ट्रम्प प्रशासनाने कोरोना योद्ध्यांनाही अमेरिकेचा दरवाजा खुला केला आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे, विशेषत: कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हिसाधारक आरोग्य सेवकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे. अमेरिकेत कोरोना फैलावाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत चालली असतानाच ट्रम्प प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या