हिंदुस्थानात सगळे काही छान चालले आहे; मोदींनी ट्रम्पना मराठीतून सांगितले

1741

ह्युस्टनमध्ये रविवारी रात्री उशिरा पार पडलेल्या ‘हाऊडी मोदी’ या शानदार सोहळ्यात हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाषण करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह तमाम अमेरिकावासींची मने जिंकली. हिंदुस्थानात सगळे काही छान चालले आहे असे मोदींनी ट्रम्प यांना मराठीसह विविध भाषांमध्ये सांगितले. या सोहळ्याद्वारे मोदींनी हिंदुस्थानचा अमेरिकेसोबतचा मैत्रीचा धागा आणखी घट्ट केला.

हिंदुस्थानचे खंबीर नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘हाऊडी मोदी’च्या शानदार सोहळ्यात आधी इंग्रजीतून व नंतर हिंदीतून भाषण करून संपूर्ण सोहळ्यावर छाप सोडली. ‘गुड मॉर्निंग ह्युस्टन’, ‘गुड मॉर्निंग टेक्सास’, ‘गुड मॉर्निंग अमेरिका’ अशा शब्दांत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

खरा मित्र व्हाईट हाऊसमध्येच!

हिंदुस्थानचा खरा मित्र जगात कोण असेल तर तो व्हाईट हाऊसमध्येच आहे असे सांगून ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ असा नाराही मोदींनी या वेळी दिला.

मोदीजी, तुम्ही सांगा मी मुंबईत येऊ का? ट्रम्प बास्केटबॉल स्पर्धेसाठी येण्यास इच्छुक

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर भलतेच खूश झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींची तोंडभरून प्रशंसा केली. मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान बलशाली झाला आहे असे कौतुक करतानाच ट्रम्प यांनी बास्केटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने ‘मोदीजी, मी मुंबईत येऊ का?’ अशी विचारणा केली. याच वेळी हिंदुस्थान हा आमचा विश्वासू मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींसोबत एकाच मंचावर बसण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सौभाग्य समजतो, असेही ट्रम्प म्हणाले. पुढच्या वर्षी मुंबईत बास्केटबॉल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी हजारो लोक मुंबईत येतील. हा खेळ पाहण्यासाठी मी मुंबईत येऊ का? तुम्ही बोलावले तर मी येईन अशा शब्दांत ट्रम्प यांनी मुंबईत येण्याची इच्छा व्यक्त केली.

इस्लामिक दहशतवाद संपवू

इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देशांनी एकजुटीने राहायला हवे. हिंदुस्थानला सोबत घेऊनच दहशतवादाचा मुकाबला करू असे ट्रम्प म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या