सात दिवसात बनवला पक्का रस्ता; लडाख सीमेवर चीनच्या हालचालींना वेग

4457

लडाख सीमेवर हिंदुस्थानी आणि चीनचे सैनिक आमने सामने आले आहेत. हिंदुस्थान आणि चीनमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवरून (लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोल) तणाव निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात पेगाँग झऱ्याचा परिसर आणि गलवान घाटीमध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करून तिथे लष्करी शिबिरे आणि बंकर बनवले आहेत. तसेच चीनकडून या भागात वेगवान हालचाली सुरू आहेत. सीमेजवळील दुर्गम भागात चीनने सात दिवसात पक्का रस्ता बांधला आहे. त्यामुळे हा भाग बळकावण्याच्या दिशेन चीनच्या हालचाली सुरू असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लडाखच्या भागात सोन्याचे साठे असण्याची शक्यता आणि याभागात असलेली विपुल खनिज संपत्ती यावर चीनचा डोळा आहे.

चीनने सीमाभागातील हाचलची वाढवत फक्त सात दिवसात वास्तविक नियंत्रणरेषेजवळ पक्का रस्ता बनवला आहे. त्यामुळे चीनच्या सैनिकांना सीमेजवळील दुर्गम भागात पोहचणे शक्य होणार आहे. या रस्त्यामुळे चीन हिंदुस्थानच्या सीमेजवळ आला असून गोगरा पोस्टपर्यंत पोहचणे चीनला सोपे होणार आहे. उपग्रहाद्वारे मिळालेले छायाचित्र आणि काही संशोधनानंतर लडाखच्या पर्वतीय भागात सोन्याचे साठे आणि विपुल खनिज संपत्ती असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे चीनने हिंदुस्थानी भागात घुसखोरी करण्यास सुरूवात केली आहे. सीमाभागात रस्ता बनवण्याबरोबच चीनने तीन आठवड्यात 4 किलोमीटर लांबीचा पक्का रस्ता बनवला आहे. गेल्या काही वर्षात चीनने सीमाभागात निर्माण केलेल्या रस्त्यांना हा मार्ग जोडला गेला आहे. लडाख सीमेपासून 10 किलोमीटर अंतरावर चीनने मोठा शस्त्रसाठी जमवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गेल्या काही आठवड्यात चीनने या भागात दोन पूल आणि रस्त्यासह इचर बांधकाम केल्याची माहिती मिळाली आहे. या मार्गाचा उपयोग लष्कराच्या वाहनांसाठी करण्यात येणार आहे. तसेच यामुळे सैनिकांना रसद आणि शस्त्रसाठी पोहचवणे सुलभ होणार आहे.

चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवत हिंदुस्थाननेही सीमाभागात सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच गोगरा पोस्टवरही गस्त वाढवण्यात आली आहे. सोन्याचे साठे आणि खनिजसंपत्ती असलेला भाग दुर्गम आहे. हिंदुस्थानी सैन्याला तिथे पोहचणे कठीण आहे. मात्र, त्याठिकाणी पोहचण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू आहेत. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू आहे. मात्र, हिंदुस्थानच्या भूमभागवर दावा सांगत चीन घुसखोरी करत असल्याने तणाव कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या