पुण्याचे गौतम बंबवाले चीनमधील हिंदुस्थानचे नवे राजदूत

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानचे उच्चायुक्त (हाय कमिशनर) म्हणून काम करत असलेले गौतम बंबवाले लवकरच चीनमधील हिंदुस्थानचे राजदूत (अॅम्बॅसेडर) म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. चीनमधले राजदूत विजय गोखले निवृत्त होत असल्याने बंबवाले यांची तिथे नियुक्ती होणार आहे.

मूळचे पुण्याचे असलेले गौतम बंबवाले हे आयएफएसच्या (इंडियन फॉरेन सर्विहस) १९८४च्या बॅचचे सदस्य आहेत. चीनमध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या मँडरिन भाषेची जाण असलेल्या बंबवाले यांनी १९८५ ते १९९१ दरम्यान बीजिंगमध्ये हिंदुस्थानचे दूतावास उपप्रमुख म्हणून काम केले होते. भूतानमधील हिंदुस्थानचे राजदूत तसेच जपान, चीन, मंगोलिया, उत्तर कोरियाच्या डेस्कचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले आहे. जर्मनी आणि अमेरिकेतही त्यांनी काम केले आहे. हिंदुस्थान-चीन यांच्या मैत्रीत सातत्याने येत असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर बंबवाले यांची नियुक्ती महत्त्वाची आहे.

पोलंडमधील हिंदुस्थानचे राजदूत अजय बिसारिया यांची बंबवाले यांच्या जागेवर पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या