बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीची उत्कंठा टिपेला

573

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात शुक्रवारी गुलाबी क्रांती घडणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ प्रथमच गुलाबी चेंडूवर बांगलादेशविरुद्ध कारकीर्दीतील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल तेव्हा हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात आणखी एक नवा अध्याय लिहिला जाईल. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही दिवस-रात्र कसोटी संस्मरणीय ठरण्यासाठी कंबर कसली आहे.

saurav-ganguly-and-jay-shah

चार दिवसांची तिकिटे कधीच खपली असून कोलकाता कसोटी हाऊसफुल झाल्याची पाटी झळकली आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या हिंदुस्थानातील पहिल्या दिवस-रात्र कसोटीचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेटशौकिनांची उत्कंठा टिपेला पोहोचली आहे.

‘टीम इंडिया’त एक बदल अपेक्षित

गुलाबी चेंडूवर लेगस्पिनरला खेळणे अवघड असते. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱया कसोटीत ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली रविचंद्रन अश्विनच्या जागेवर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला अंतिम अकरामध्ये संधी देण्याची शक्यता आहे. उमेश यादव, इशांत शर्मा व मोहम्मद शमी हे त्रिकूट वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतील, तर यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहालाच पसंती मिळणार आहे.

virat-and-ravi-shahstri-day

‘गुलाबी चेंडूवर प्रथमच दिवस-रात्र कसोटी खेळण्यासाठी ‘टीम इंडिया’ उत्सुक आहे. आमच्यासाठी हे नवे आव्हान असेल. फलंदाज कसे खेळतात, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण कसे होते आणि दव कधी पडणार यावर बरेच अवलंबून असेल. त्यामुळे गुलाबी चेंडूने कसोटी क्रिकेट खेळणे आव्हानात्मक आहे, असे मत ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

दुपारी 1 वाजता होणार सामना सुरू

हिंदुस्थानात हिवाळा असल्याने दवाच्या भीतीमुळे दिवस-रात्र कसोटी सामना आठपर्यंत खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या ऐतिहासिक कसोटीस दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तीन वाजता पहिले सत्र संपेल अन् 40 मिनिटांचा उपाहाराचा ब्रेक होईल. 3.40 वाजता सुरू झालेले दुसरे सत्र 5.40 वाजता संपेल अन् चहापानासाठी 20 मिनिटांचा ब्रेक होईल.  तिसरे सत्र सायंकाळी 6 वाजता सुरू होऊन 8 वाजता दिवसाचा खेळ संपेल.

ऐतिहासिक कसोटीची होणार अनोखी सुरुवात

या दिवस-रात्र कसोटीच्या सुरुवातीला लष्करीचे पॅराटपर्स ईडन गार्डन स्टेडियमवर आकाशात भरारी घेतील व नाणेफेकीपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांकडे गुलाबी चेंडू सोपवतील. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते पारंपरिक ‘ईडन बेल’ वाजवून या ऐतिहासिक कसोटी सामन्याला प्रारंभ होईल.

दिग्गज खेळाडूंचाही होणार सन्मान

कसोटी सामन्यादरम्यानच्या चहापानचा ब्रेक होईल तेव्हा क्रिकेटसह इतर खेळांतीलही अनेक माजी कर्णधार उघडय़ा गाडय़ांमध्ये बसून मैदानावर चक्कर मारणार आहेत. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून विविध स्टार खेळाडूंचा सन्मान करण्यात येईल. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरसह ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा, टेनिस स्टार सानिया मिर्झा, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन पी. व्ही. सिंधू व सहा वेळची जगज्जेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम या खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. मान्यवर पाहुण्यांसाठी खास स्मृतिचिन्ह बनविण्यात आले आहे. यावेळी हिंदुस्थान व बांगलादेशमध्ये 2000 साली झालेल्या कसोटी सामन्यातील खेळाडूंचाही गौरव करण्यात येणार आहे. सौरभ गांगुलीचा कर्णधार या नात्याने तो पहिला कसोटी सामना होता.’

आपली प्रतिक्रिया द्या