हिंदुस्थान-बांगलादेश परस्पर संबंध

19

ब्रिगेडियर हेमंत महाजन

[email protected]

चीनचा प्रभाव कमी व्हावा यासाठी हिंदुस्थान बांगलादेशबरोबर संरक्षण संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. बांगलादेशबरोबर संरक्षण भागीदारी वाढवण्याचा हिंदुस्थानचा इरादा आहे. हसिना यांच्या भेटीदरम्यान महत्त्वाचे संरक्षण करार करण्यात येणार आहेत. हिंदुस्थान सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची मदत करणार असून त्यातून बांगलादेश संरक्षण सामग्री विकत घेणार आहे. त्याचबरोबर संयुक्त गस्ती, संयुक्त कवायती, संरक्षण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण असे काही महत्त्वपूर्ण करारही अलीकडेच करण्यात आले.

हिंदुस्थान आणि बांगलादेश दरम्यान गेल्या आठवडय़ात संरक्षण आणि नागरी अणू सहकार्यासह विविध क्षेत्रांत २२ महत्त्वाचे करार करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी हिंदुस्थानात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशशी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी मोदी स्वतः ढाक्याला गेले होते. त्यानंतर बांगलादेशसोबतचा बहुप्रलंबित भूसीमारेषा करार पूर्णत्वास नेण्यात आला. हा करार पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती व हिंमत यूपीए सरकारकडे नव्हती. राजकीय पक्ष आणि इतर राज्यांकडून होणाऱया विरोधाच्या  भीतीपोटी हा करार केला जात नव्हता. मोदींनी कोणतीही भीती न बाळगता, विरोधाला न जुमानता हा करार पूर्णत्वास नेला. त्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदुस्थानविषयीची चांगली भावना निर्माण झाली.

सामरिकदृष्टय़ा बांगलादेश हा हिंदुस्थानच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानची सर्वात मोठी चार हजार किलोमीटरची भूसीमारेषा बांगलादेशबरोबर आहे. हिंदुस्थानशी निगडित सीमारेषेच्या संरक्षणासाठी सुरक्षा कुंपण घालण्याचे कामही पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. या सीमेवर गस्तही वाढवण्यात येणार आहे. बांगलादेशमधील लोकशाहीच्या अस्तित्वावर, शांततेवर ईशान्य हिंदुस्थानातील स्थैर्य आणि शांतता अवलंबून आहे. पूर्वी ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवाद्यांना बांगलादेशमध्ये आश्रय मिळत होता. खलिदा झिया यांच्या काळात हिंदुस्थान विरोधातील कारवायांसाठी ‘उल्फा’सारख्या संघटनेकडून अशा प्रकारचा वापर करण्यात आला होता; परंतु शेख हसिना यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर  बांगलादेशात धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शासन-प्रशासन आणण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानात आश्रय घेणाऱया दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या काळात हिंदुस्थानातील फुटीरतावादी १७ नेत्यांना बांगलादेशात अटक करण्यास सुरुवात झाली. कित्येक जणांना हिंदुस्थानकडे हस्तांतरितही करण्यात आले आहे.

एकुणातच शेख हसिना यांचे शासन हिंदुस्थानसाठी उपकारक ठरणारे आहे. आगामी निवडणुकांमध्येही त्याच पंतप्रधान बनण्यात हिंदुस्थानचा फायदा आहे. सध्या हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार असमतोल आहे. मागील काळात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार हा ६.८ अब्ज डॉलर इतका होता. शेख हसिना यांच्या दुसऱया कार्यकाळामध्ये हा व्यापार १७ टक्क्यांनी वाढला. एकूण ६.८ अब्ज डॉलरच्या व्यापारात ५.४५ अब्ज डॉलरची निर्यात हिंदुस्थान करतो आहे; तर केवळ ६९० दशलक्ष डॉलर्सची आयात करतो आहे. हा व्यापार असमतोल दूर करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बांगलादेशला २४ अब्ज अमेरिकी डॉलरचे आर्थिक साह्य देऊ केले आहे. चीनकडून बांगलादेशी नौदलाला दोन पाणबुडय़ा मिळणार आहेत. मलाक्का सामुद्रधुनीत हिंदुस्थानी नौदलाकडून होऊ शकणारी संभाव्य कोंडी फोडण्यासाठी चीनच्या म्यानमार आणि बांगलादेशातून थेट बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराशी संपर्क जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बांगलादेशमधील चितगाव बंदरावर चीनचा डोळा आहे. बांगलादेशनेही चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पात सहभागी होण्यास अनुकूलता दर्शवली आहे. चीनच्या या अफाट मदतीपुढे हिंदुस्थानने बांगलादेशला देऊ केलेली ४.५ अब्ज डॉलर्सची नागरी प्रकल्पांसाठीची आणि ५०० दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत तुटपुंजीच आहे. याशिवाय बांगलादेशच्या पायाभूत सुविधा उभारणी, ऊर्जा, दळणवळण आदी क्षेत्रांतही चीनने हिंदुस्थानला तगडे आव्हान उभे केले आहे. चीनचा प्रभाव कमी व्हावा यासाठी हिंदुस्थान बांगलादेशबरोबर संरक्षण संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. बांगलादेशबरोबर संरक्षण भागीदारी वाढवण्याचा हिंदुस्थानचा इरादा आहे. हसिना यांच्या भेटीदरम्यान महत्त्वाचे संरक्षण करार करण्यात येणार आहेत. हिंदुस्थान सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची मदत करणार असून त्यातून बांगलादेश संरक्षण सामग्री विकत घेणार आहे. त्याचबरोबर संयुक्त गस्ती, संयुक्त कवायती, संरक्षण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण असे काही महत्त्वपूर्ण करारही अलीकडेच करण्यात आले.

हिंदुस्थान आणि बांगलादेशमध्ये डिझेलचा पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकली जाणार आहे. बांगलादेशमध्ये हिंदुस्थानी कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. बांगलादेशला होणाऱया वीजपुरवठय़ात हिंदुस्थान वाढ करणार आहे. दोन्ही देशांमध्ये रेल्वे आणि बस सेवा सुरू झाल्यास त्याचा फायदाच होणार आहे. हिंदुस्थान बांगलादेशसोबत ऊर्जा, सायबर सुरक्षा, सिव्हिल न्यूक्लिअरसह अनेक क्षेत्रांमध्ये व्यावसायिक भागीदारी वाढवत असून हिंदुस्थानी कंपन्या बांगलादेशमधील कंपन्यांसोबत मिळून तेलपुरवठय़ाचे काम करत आहेत. त्यादृष्टीने भविष्यात अनेक करार केले जाणार आहेत.

अर्थात बहुप्रतीक्षित तिस्ता जलवाटपावरील करार मात्र या दौऱयात अपूर्णच राहिला. हा करार दोन्ही देशांकरिता अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थान वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. मूलतत्त्ववादी आणि दहशतवादी संघटनांच्या कारवाया हा बांगलादेशसाठीही चिंतेचा विषय आहे. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर बॉर्डर हट म्हणजे छोटे बाजार उभारणे, बांगलादेशच्या न्यायिक अधिकाऱयांना प्रशिक्षण, बांगलादेशात कम्युनिटी क्लिनिकची स्थापना, जलवाहतूक, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व बांगलादेश यांच्यात समन्वय असे परस्पर सहकार्याचे स्वरूप आहे. हिंदुस्थानकडून बांगलादेश ‘सोनार बांगला’ व्हावा म्हणून पावले टाकली जात आहेत. हिंदुस्थानात बांगला घुसखोरांची समस्या आहे. पण, बांगलादेशची प्रगती झाली आणि बांगलादेश व हिंदुस्थान यांनी हातात हात घेऊन सहकार्याचा, प्रगतीचा, व्यापाराचा आणि उन्नतीचा नवा सेतू जमवला तर उभय देशाला ते फायदेशीर ठरेल आणि घुसखोरी वगैरे समस्याही नष्ट होण्यास मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या