केंद्र सरकार देशाची संपत्ती विकतेय! वेबिनारमध्ये मान्यवरांनी मांडले मत

केंद्राने सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. केंद्र सरकार अदानीसारख्या आपल्या मित्रांना रेल्वे, एलआयसी, विमानतळ यासारखी महत्त्वाची क्षेत्रे खुली करून देत आहे. असे करून केंद्र सरकार देशाची संपत्ती मित्रांना विकतेय, असा आरोप ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी सचिव विश्वास उटगी यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘बँक व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण : बुडणारी अर्थव्यवस्था देशाला कुठे घेऊन जाईल?’ या विषयावर वेबिनार घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘आज मोदी सरकार बँकांचे खासगीकरण करू पाहतेय पण त्यामुळे आपली अर्थव्यवस्था अजून खालावेल. कारण खासगी बँका जास्त दिवस टिकत नाहीत. खासगी बँक वाचविण्यासाठी केंद्र सरकार पैसे देते, तर दुसरीकडे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेसारखी सहकारी बँक वाचविण्यात केंद्र सरकार कोणतीही रुची दाखवत नाही.’ शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘नरेंद्र मोदी यांनी ज्या पूर्वीच्या सक्षम र्आिथक संस्था आहेत, त्यासुद्धा विकायला काढल्या आहेत.’ वेबिनारमध्ये मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, काँग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, कार्यालयीन सचिव राजेश भाई ठक्कर, मुंबई काँग्रेस सोशल मीडिया सेलचे आशिष जोशी व रुद्रेश कौल तसेच सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या