हिंदुस्थान विश्वविजेता! 

12
सामना ऑनलाईन । डरबन
हिंदुस्थानच्या अंडर १९ च्या क्रिकेट टीमने इतिहास रचत चौथ्यांदा विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. आज न्यूझीलंडमधल्या माऊंट मॉन्गानुईच्या मैदानात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पृथ्वी शॉच्या टीमने कांगारूंना धूळ चारली. मनजोत कालरा याची शतकी खेळी आणि शिवा सिंग, इशान पोरेल, कमलेश नागरकोटी, अनुकुल रॉय यांच्या धडाकेबाज गोलंदाजीने हिंदुस्थानला विश्वविजेते पद मिळवून दिले. या विजयाने हिंदुस्थानच्या अडंर १९ टीमने चार वेळा हा विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला आहे.
अंडर- १९ विश्वचषकातील  हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामधील अंतिम सामना आज न्यूझीलंडमधल्या माऊंट मॉन्गानुईच्या मैदानात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीस ऑस्ट्रेलियाच्या जॅक एडवर्डस आणि मॅक्स ब्रायन्टने अवघ्या पाच षटकांत ३२ धावा ठोकत डावाची चांगली सुरुवात केली. परंतु ईशान पेरॉलने त्या दोघांनाही तंबूत माघारी पाठवले. त्यानंतर कमलेश नागरकोटीनं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघाला बाद केले. ऑस्ट्रेलियाचा संघाच्या १८५ धावांवर ५ विकेट पडलेल्या असताना अवघ्या २७ धावा देत हिंदुस्थानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिाच्या पाच फलंदाजांना तंबूत परत पाठवले. शिवा सिंग, इशान पोरेल, कमलेश नागरकोटी, अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

हिंदुस्थानची सुरुवात थोडी अडखळत झाली. पाऊसामुळे देखील सामन्यात व्यत्यय आला होता. मात्र त्यानंतर हिंदुस्थानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढली. सलामीला आलेल्या मनजोत कालराने धडाकेबाज शतकी खेळी करत हिंदुस्थानला जेतेपद मिळवून दिले. पृथ्वी शॉ, शुभमन गिल, हार्विक देसाई यांनी त्याला चांगली साथ दिली. मात्र विजयाचा खरा शिलेदार मनजोत ठरला. हिंदुस्थानचा माजी फलंदाज राहुल द्रविड याच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या या टीमने त्यांच्या प्रशिक्षकासारखाच संयमी खेळ करत हिंदुस्थानला आणखी एक विश्वचषक मिळवून दिला.
मनजोत कालरा ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’
सलामीला आलेला फलंदाज मनजोत कालराच्या धडाकेबाज शतकी खेळीसाठी त्याला आजच्या सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आले. मनजीतने १०२ चेंडूमध्ये १०१ धावा केल्या. यात त्याने ८ चौकार आणि तीन षटकार ठोकले.
शुभमन गिल ठरला ‘मॅन ऑफ द सिरीज’
संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत उत्तम फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलला या सिरीजचा ‘मॅन ऑफ द सिरीज’ घोषित करण्यात आले. शुभमन गिलने या सिरीजमध्ये सहा सामन्यात ३७२ धावा केल्या. सहा सामन्यातील पाच सामन्यातच त्याला फलंदाजीची संधी मिळाली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शुभमन दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडीजचा फलंदाज ए. अथांजे हा ४१८ धावा करून पहिल्या स्थानावर आहे. मात्र ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कारात शुभमनने  ए. अथांजे मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.
आपली प्रतिक्रिया द्या