बांगलादेशचा पराभव करत हिंदुस्थानची फायनलमध्ये धडक

18

सामना ऑनलाईन । कोलंबो

तिरंगी टी-२० मालिकेत हिंदुस्थानने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने बांगलादेशवर १७ धावांनी विजय मिळवला. धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने कर्णधार रोहित शर्माच्या ८९ धावांच्या जोरावर ३ बाद १७६ धावा केल्या. गेल्या सहा डावांमध्ये फ्लॉप झालेल्या रोहितने बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढत हिटमॅन हे नाव सिद्ध केले. रोहितने ६१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांनी आपली खेळी सजवली. रोहित व्यतिरिक्त सलामीवीर शिखर धवनने २७ चेंडूत ३५ आणि सुरेश रैनाने ३० चेंडूत ४७ धावांची तुफानी खेळी केली. दिनेश कार्तिक २ धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून रुबेल हुसेनने २ बळी घेतले.

हिंदुस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. १२ धावांवर लिटन दासच्या रुपाने त्यांचा पहिला बळी गेला. फिरकी गोलंदाज वाशिंग्टन सुंदरने त्याला टिपला. त्यानंतर ठरावीक अंतराने गडी गमावल्याने बांगलादेशचा संघ दबावात आला आणि आवश्यक धावगती राखू शकला नाही. मुशफिकूर रहिमने नाबाद ७२ धावा करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने बांगलादेशचा संघ २० षटकात ६ बाद १५९ धावा करू शकला. हिंदुस्थानने १७ धावांनी विजय मिळवत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक दिली. वाशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले, तर चहल, सिराज आणि ठाकूरने प्रत्येकी एक बळी मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या