हिंदुस्थानकडून बांगलादेशचा सफाया, २४० धावांनी विजय

32

सामना ऑनलाईन । लंडन

चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सराव सामन्यात हिंदुस्थानने बांगलादेशचा सफाया करत तब्बल २४० धावांनी मोठा विजय संपादन केला आहे. हिंदुस्थानने दिलेले डोंगराएवढे आव्हान बांगलादेशला पेलवले नाही. बांगलादेशचा डाव २३.४ षटकांत ८४ धावांमध्ये गुंडाळण्यात गोलंदाजांना यश आले. कर्णधार विराट कोहलीने ज्या गोलंदाच्या हाती चेंडू सोपवला त्या प्रत्येकाने बळी मिळवून दिला. बांगलादेशकडून खेळताना हसन, रहिम आणि इस्लामला दुहेरी धावसंख्या गाठता आली. हसनने सर्वाधिक २४ धावा केल्या, त्या खालोखाल इस्लामने १८, तर रहिमने १३ धावा केल्या. हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी तिखट मारा केला. भूवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने प्रत्येकी बळी मिळवले, तर शमी, बुमराह, पाड्या आणि अश्विनने प्रत्येकी एक बळी मिळवला.

याआधी प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करत मैदानावरील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्तिकने ७७ चेंडूत ९४ आणि हार्दिक पांड्याने ५४ चेंडूत ८० धावा केल्या. शिखर धवनने ६० आणि केदार जाधवने ३१ धावांचे योगदान दिले. फलंदाजांच्या जबरदस्त कामगीरीच्या जोरावर हिंदुस्थानने ५० षटकांत ७ बाद ३२४ धावांचा डोंगर उभारला. बांगलादेशच्या हुसेनने ३ आणि इस्लामने २ बळी घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या