हिंदुस्थानी संघ पाकिस्तानला सहज पराभूत करील – पाकचे ‘कडवे’ फॅन चाचा शिकागो 

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानी संघाशी पाकिस्तानची तुलना होऊच शकणार नाही. त्यामुळे ४ जूनच्या सलामीच्या लढतीत टीम इंडिया पाकिस्तानला सहज पराभूत करील, असे पाक संघाच्या घमेंडीला धक्का देणारे भाकित पाकिस्तानचे कडवे क्रिकेट फॅन चाचा शिकागो अर्थात मोहम्मद बशीर यांनी केले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान लढतींना नेहमीच उपस्थित असणारे चाचा शिकागो यंदा पाकिस्तानच्या कामगिरीवर नाराज आहेत. ते कुटुंबासह मक्केला जाणार असल्याने २०११ पासून प्रथमच हिंदुस्थान-पाक लढतीत क्रिकेटशौकिनांना दिसणार नाहीत.

एका बाजूला हिंदुस्थानी संघात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग असे सुपरस्टार असताना पाकिस्तानी संघात शोएब मलिक सोडला तर एकही मोठा खेळाडू दिसत नाही. त्यामुळे यंदा बलाढय़ टीम इंडिया पाकिस्तानचा सहज पराभव करील असे मला वाटते असे सांगून चाचा शिकागो म्हणाले, कधी काळी पाकिस्तानी क्रिकेट संघात जावेद मियाँदाद, वासीम अक्रम, वकार युनूससारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. आताच्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंची नावेही मला माहीत नाहीत. त्यामुळे हिंदुस्थानला पाकिस्तानला पराभूत करणे फारसे कठीण जाणार नाही. २०११ विश्वचषक उपांत्य फेरीपासून हिंदुस्थान व पाकिस्तान यांच्यातील एकही सामना न चुकवणारे चाचा शिकागो रविवार, ४ जूनच्या हिंदुस्थान-पाक चॅम्पियन करंडक लढतीला मात्र उपस्थित राहणार नाहीत.

हिंदुस्थान जेतेपदही पटकावेल

यंदाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळणारा हिंदुस्थानी संघ बलाढय़ असून पुन्हा जेतेपदही पटकावू शकेल. मी २०११ पासून एकही हिंदुस्थान-पाकिस्तान लढत चुकवलेली नाही. मला इंग्लंडला येऊन ही लढत पाहायला आवडले असते, पण महिनाभरापूर्वीच कुटुंबासह मक्केला जाणे निश्चित केल्याने मला इंग्लंडला येणे जमणार नाही. सोमवारीच सचिन तेंडुलकरचा ‘हनुमान’ सुधीर गौतम याने मला हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला येणार का हे विचारण्यासाठी फोन केला होता, असे चाचा शिकागो शेवटी म्हणाले

आपली प्रतिक्रिया द्या