हिंदुस्थानच्या अंध टी-२०संघाने विश्वचषक जिंकला

43

बंगळुरू – क्रिकेटच्या रणांगणावर पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजण्याची हिंदुस्थानी परंपरा कायम राखत हिंदुस्थानच्या अंध क्रिकेट संघाने पाकडय़ांना ९ गडी राखून पराभूत करीत दुसऱयांदा अंधांच्या टी-२० विश्वचषकावर देशाचे नाव कोरले. आज गतविजेत्या हिंदुस्थानने अंतिम लढतीत पाकिस्तानचा फडशा पाडला.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानचे १९८ धावांचे आव्हान हिंदुस्थानी संघाने १७.४ षटकांत फक्त १ विकेट गमावून पार केले. विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना दृष्टीहीनांच्या टीम इंडियाने साखळीतील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचे उट्टे फेडले.

अंधांच्या टी-२० विश्वचषकात हिंदुस्थानने साखळीत ९ पैकी ८ लढती तर पाकिस्तानने ९ पैकी ९ लढती जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. साखळीत हिंदुस्थानला पाककडून पराभव पत्करावा लागला होता पण अंतिम फेरीत त्याचा पुरेपूर वचपा टीम इंडियाने घेतला आणि जेतेपद राखले.

जयरामय्या विजयाचा शिल्पकार

अंध टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ९९ धावांची नाबाद खेळी करणारा प्रकाश जयरामैया हिंदुस्थानी विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला अजयकुमार रेड्डी (४३) व गोलंदाज केतन पटेल (२९ धावांत २), जफर इक्बाल (३३ धावांत २ बळी) यांची उत्तम साथ लाभली.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान – २० षटकांत ८ बाद १९७ (बदर मुनीर ५७, मुहम्मद जमील २४); केतन पटेल २/२९, जफर इक्बाल २/३३) पराभूत वि. हिंदुस्थान – १७.४ षटकांत १ बाद २०० (प्रकाश जयरामैया नाबाद ९९, अजयकुमार रेड्डी ४३).

आपली प्रतिक्रिया द्या