ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, जागतिक कन्या दिनी महिला संघाची हिंदुस्थानला विजयी भेट

तिसऱ्या आणि अंतिम एक दिवसीय लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थानी महिला संघाने 2 विकेट्सने पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत हिंदुस्थानच्या महिला संघाने बाजी मारली आणि ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ गेल्या 26 लढतींपासून अपराजित होता, मात्र मिताली राजच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या संघाने त्यांचा हा विजयरथ रोखत व्हाईट वॉशची टाळला.

ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानच्या महिला संघापुढे विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या जोडीने 59 धावांची दमदार सलामी दिली. मंधाना बाद झाल्यानंतर शेफाली आणि यास्तिका वर्मा यांच्यात 101 धावांची भागिदारी झाली. या दरम्यान दोघींनीही अर्धशतक झळकावले. दरम्यान, रिचा घोष शून्य, मिताली राज 16 आणि पूजा वस्त्राकर 3 धावांवर बाद झाल्याने हिंदुस्थानचा संघ अडचणीत आला.

सातव्या विकेटसाठी दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांच्यात चांगली भागिदारी झाली. या दोघी संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच आधी दिप्ती 31 धावांवर आणि नंतर स्नेह राण 30 धावांवर बाद झाली. अखेरच्या षटकात हिंदुस्थानच्या संघाला 4 धावांची आवश्यकता होती आणि दोन विकेट्स हाती होत्या. अनुभवी झुलन गोस्वामी हिने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 264 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव एकवेळ 4 बाद 87 असा संकटात होता, मात्र अॅशले गार्डनर हिने 67 आणि बेथ मूनी हिने 52 धावांची खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. तर ताहलिया मॅकग्रा हिने 32 चेंडूत 47 धावांचे बहुमुल्य योगदान दिले.

आपली प्रतिक्रिया द्या