जवानाच्या क्रूर हत्येनंतर तणाव वाढला, हिंदुस्थान-पाकिस्तानमधील चर्चा रद्द

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये न्यूयॉर्कमध्ये होणारी चर्चा रद्द करण्यात आली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी जवानांनी हिंदुस्थानी जवानाची निर्घृण हत्या केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या यूएनजीएच्या (यूनायटेड नेश्न्स जनरल असेंब्ली) परिषदेत चर्चेसाठीचा प्रस्ताव पाकिस्तानने हिंदुस्थानसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर अवघ्या 24 तासात रद्द करण्यात आला आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मकदुम शाह महमुद कुरेशी यांच्यात ही चर्चा होणार होती.

वाचा – तिरंग्यात लपेटलेल्या मृतदेहांचा आणखी किती काळ गर्व करायचा, शहीद जवानाच्या मुलाचा सरकारला सवाल

इम्रान खान यांचा खरा चेहरा समोर आला
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी जारी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चा रद्द करण्याची कारणे दिली आहेत. पाकिस्तानने सीमारेषेवरील हिंदुस्थानच्या जवानाची निर्घृण हत्या केली, तसेच सरकारने नुकत्याच जारी केलेल्या 20 पोस्टाच्या तिकीटांवर दहशतवाद्यांची महिमा कथन केली आहे. यावरून पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान इम्रान खान यांचा मनसुबा आणि खरा चेहरा समोर आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

वाचा – धक्कादायक! जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली तीन पोलिसांची हत्या

पाकिस्तानने काढले बुरहानचे टपाल तिकीट, शहिदाचा दर्जाही दिला
एकीकडे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पत्र पाठविण्याचे नाटक केले तर दुसरीकडे ‘नापाक’ चाल खेळली आहे. हिंदुस्थानी जवानांनी कश्मीरात दोन वर्षांपूर्वी दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान घातले. पण पाकडय़ांना फारच पुळका आला असून बुरहानला ‘शहीद’ म्हणून त्याचे टपाल तिकीट काढले आहे. इम्रान खान सरकारने 20 नवी टपाल तिकिटे छापली असून त्याखाली ‘हिंदुस्थानी सैनिकांकडून पीडित’ असे नमूद केले आहे. दरम्यान, या टपाल तिकिटांच्या माध्यमातून कश्मीरचा प्रश्न राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कराची येथील टपाल मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा – पाकड्यांचे सैतानी कृत्य, जवानाचे अपहरण करून शिर छाटले !

सुषमा स्वराज आणि पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा होणार होती
न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार होती. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे परराष्ट्रमंत्री मकदुम शाह महमुद कुरेशी यांच्यात चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी दिली होती.