हिंदुस्थान आणि कॅनडाच्या वाढत्या वादात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या आरोपांवर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडाने केलेले आरोप गंभीर असून हिंदुस्थानने त्यांना तपासात मदत केली पाहिजे, असा सल्ला अमेरिकेने दिला आहे.
हिंदुस्थानने कॅनडाच्या आरोपांबाबत तपासात मदत करावी. मात्र, हिंदुस्थानने दुसरा पर्याय निवडला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मॅथ्यू मिलर म्हणाले. असे पहिल्यांदाच झाले नाही तर याआधीही अमेरिकेने कॅनडाची बाजू घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी हिंदुस्थान सरकारने कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली होती. हिंदुस्थानच्या प्रतिक्रियेवर अमेरिकेने तेव्हाही म्हटले होते की, कॅनडाच्या तपासात सहकार्य करायला हवे.
काय आहे प्रकरण?
18 जून 2023 रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडातील सरे शहरात असलेल्या गुरुद्वाराबाहेर काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर 2023 मध्ये या हत्येमागे हिंदुस्थानी एजंट असल्याचे सांगितले होते. ट्रुडोच्या गंभीर आरोपांना उत्तर देताना हिंदुस्थानने आरोप फेटाळले होते. कॅनडाने या प्रकरणी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. या प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. 14 ऑक्टोबर 2024 रोजी ट्रूडो सरकारने पुन्हा एकदा निज्जरच्या हत्येमध्ये हिंदुस्थानचा सहभाग असल्याचा पुनरुच्चार केला. यानंतर हिंदुस्थानने आपले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले. तसेच कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत तात्काळ प्रभावाने देश सोडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.