हिंदुस्थान-चीनमधील तणाव वाढल्यास चीनची अर्थव्यवस्था कोलमडणार…वाचा सविस्तर…

5633

कोरोनाच्या मुद्द्यापासून जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी चीनने लडाख सीमेवर गस्त वाढवली. गलवान घाटी आणि पेगाँग सरोवराच्या परिसरात लष्करी छावण्या उभारल्या आणि हिंदुस्थानशी तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला. चीनचा हा डाव आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान मागे हटेल किंवा चर्चा होईल आणि लडाखचा भूभाग बळकावता येईल, असा चीनचा अंदाज होता. मात्र, हिंदुस्थानने मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने चीन त्याच्याच डावात अडकला आहे. चीनने माघार घेतली नाही, तर सर्वात मोठा फटका त्यांच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. आताची परिस्थिती 1962 पेक्षा वेगळी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

जगातील महासत्तापैकी एक असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये तणाव आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री आणि दोन्ही देशांच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे चीनची चिंता वाढली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानला पाठिंबा दिल्यास चीनला माघार घेण्याशिवाय पर्याय नाही. युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनच्या नागरिकांना केले होते. मात्र, दोन्ही देशात तणाव वाढवताना अर्थव्यवस्थेच्या धोक्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. दोन्ही देशात तणाव आणखी वाढल्यास चीनच्या निर्यातीला सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यांच्या निर्यातीपैकी 17 टक्के निर्यात फ्कत अमेरिकेत होते. व्यापारयुद्धामुळे दोन्ही देशात तणाव आहे. तसेच कोरोना संकटानंतर ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाही फटका चीनला बसणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे चीनमध्ये गुतंवणूक करणाऱ्या परदेशी कंपन्या आता हिंदुस्थानकडे वळल्या आहेत.

चीनच्या निर्यातीप्रमाणे तेथील उद्योगधंद्यानाही मोठा फटका बसणार आहे. चीनच्या मालाला जगभरात मागणी नसल्याने कारखाने सुरू करूनही उपयोग नाही. त्यातच अनेक कंपन्या आणि कारखाने बंद झाल्याने युवकांमध्ये नाराजी आहे आणि सरकारविरोधात आंदोलने होत आहे. त्यामुळे देशातील असंतोष रोखण्याचे आव्हानही चीनसमोर आहे. सध्या चीनची अर्थव्यवस्था 13.7 ट्रिलियन डॉलरची आहे. पहिल्यांदा चीनच्या अर्थव्यवस्थेत 6.8 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे चीन मंदीकडे वाटचाल करत आहे. तसेच मंदीतून बाहेर पडण्यासाठी चीनने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा अर्थव्यवस्थेला काहीही उपयोग होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे चीनचे इतर देशांशी संबंधही बिघडले आहेत. त्यामुळे हिंदुस्थान चीनमधील तणाव आणखी वाढल्यास चीनची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या