एक इंचही मागे हटणार नाही, हिंदुस्थानचा चीनला इशारा; ‘जशास तसे’ उत्तर देणार

8563

लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्ये वेगाने घडामोडी होत आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची सैन्यातील टॉपच्या अधिकारी आणि कमांडर सोबत महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. बैठकीत LOC वरील स्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि पुढील रणनीती याबाबत चर्चा होईल.

गेल्या 20 दिवसांपासून लडाखमध्ये हिंदुस्थान आणि चिनी सैनिक आमनेसामने आले आहेत. सीमारेषेवर होत असलेल्या रस्तेबांधणी आणि बांधकामाला चीनने विरोध केला, मात्र हिंदुस्थानने आम्ही आमच्या भूभागावर निर्माणकार्य सुरू ठेवणार असल्याचे ठणकावले. या नंतर चीनने सीमारेषेवर सैन्य तैनात करण्यास सुरुवात केले, याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने देखील सीमारेषेवर चीनच्या बरोबरी एवढे सैन्य तैनात केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. हिंदुस्थानने आम्ही एक इंचही मागे हटणार नाही असा इशारा चीनला दिला आहे. त्याच अनुषंगाने जनरल नरवणे यांनी बैठक बोलावली आहे.

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावर बोलताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाचे सदस्य एस.एल.नरसिम्हन यांनी प्रतिक्रिया दिली. याआधीही दोन्ही देशांचे सैन्य सीमारेषेवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. लडाखमधील स्थिती जास्त तणावाची नाही. हिंदुस्थानकॅगे लष्कर योग्य ती खबरदारी बाळगत असून त्याला मीठ-मिरची लावून दाखवू नये. कमांडर, मिलिटरी कमांडर यांच्यात चर्चा सुरू आहे. 22 आणि 23 मी रोजी उच्चस्तरीय बैठक झाली. चर्चेद्वारे यावर तोडगा निघू शकतो, असेही एस.एल.नरसिम्हन म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक
तत्पूर्वी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुख यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लडाखमधील हिंदुस्थानी सैन्याची स्थिती आणि सैन्य तयारी यावर चर्चा झाली.

सिक्कीम, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्य वाढवणार
लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीत हिंदुस्थानने उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये चीनच्या सीमेजवळ सैन्य वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिंदुस्थान चीनच्या प्रत्येक आक्रमक पावलाला जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचा संदेश देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या