चीनची ‘पाकिस्तानी’ चाल, लडाखमध्ये ‘त्या’ छोट्याशा संधीचा फायदा उठवत टाकला डेरा

4459

लडाखमध्ये हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले आहे. जवळपास एक महिन्यापासून येथे तणावाची स्थिती असून दोन्ही सैन्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकावर बैठका सुरू आहेत. मात्र यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने दोन्ही देशांच्या सीमेवर सैन्य वाढवले आहे. लडाखमधील ज्या भागात चीनने डेरा टाकला आहे तिथे चिनी सैन्याच्या हालचाली वाढत आहेत. चीनने या भागात जम बसवण्यासाठी पाकिस्तानी चाल वापरली आहे.

लष्करातील काही जवानांना कोरोनाची लागण झाल्याने हिंदुस्थानने एलएसीवर मार्च महिन्यात होणारा युद्ध अभ्यास काही कालावधीसाठी पुढे ढकलला होता. याचाच फायदा उठवत चीनने हिंदुस्थानी लष्कराच्या पेट्रोलिंग भागात पुढे सरकत आपली स्थिती मजबूत केली आहे. याचा सुगावा लागताच हिंदुस्थानने चिनी सैन्यापासून 500 मीटर अंतरावर डेरा टाकला. दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आल्यावर यात काही जखमी झाले, तेव्हापासून येथील परिस्थिती तणावाची आहे.

‘कोल्ड वॉर’ – अमेरिकेला साथ देऊ नका, परिणाम भयानक होतील; चीनची हिंदुस्थानला धमकी

‘इकनोमिक्स टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानी लष्कर आणि भारतीय-तिबेट सीमा पोलीस मार्चमध्ये सीमेवर युद्धाचा सराव करणार होते. मात्र काही जवानांना कोरोना झाल्याने हा सराव पुढे ढकलण्यात आला. या सरावात हिमाचल बेसचे जवानही सहभागी होतात. कोरोनाचा वाढता धोका पाहता लडाखमध्ये होणारा हा सराव रद्द करावा लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

images-4

हिंदुस्थान प्रमाणे चीनने देखील आपल्या सैन्याचा सराव एक महिन्यासाठी स्थगित केला, मात्र चीनने चलाखी करत गलवान खोरे आणि पेंग्यांग सरोवर परिसरात सैन्य वाढवले. येथे चीनचे सैन्य पोहोचल्याने दौलत बेग ओलडी आणि काराकोरम भागाला जोडणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे हिंदुस्थानी लष्कराने तात्काळ मोर्चा सांभाळत येथे आपले सैन्य वाढवले.

चीनची पाकिस्तानी चाल
चीनचा ‘खरा’ चेहरा समोर येताच हिंदुस्थानने प्रोटोकॉल तोडत लेहमध्ये तैनात लष्कराला येथे पाचारण केले. मात्र तत्पूर्वीच चीनने परिस्थिती आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले होते. गलवान भागात चीनने 3 हजार 400 आणि पेग्यांग सरोवर परिसरात 3 हजार 60प जवान तैनात केले होते. कारगिल युध्दावेळी पाकिस्तानने हीच चाल खेळत महत्वाच्या भागात कब्जा केला होता, मात्र हिंदुस्थानच्या लष्कराने जीवाची बाजी लावत आपला भूभाग पुन्हा काबीज केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या