मोदी-जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट

511

आशिया खंडातील शक्तिशाली देश अशी ओळख असलेल्या हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आज महाबलीपुरम या तामीळनाडूमधील प्राचीन शहरात भेट झाली. जवळपास तासाभराच्या या ऐतिहासिक भेटीत दोन्ही नेत्यांनी कोणताही शिष्टाचार आड येऊ न देता मुक्तपणे विविध विषयांवर संवाद साधला. तसेच मोदी यांनी जिनपिंग यांना येथील प्रचीन मंदिर, भलीमोठी दगडी शिळा दाखवून त्याची माहिती दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी तामीळनाडूचा पारंपरिक पोशाख असलेला पांढरा शर्ट आणि लुंगी तर जिनपिंग यांनी पॅण्टशर्ट परिधान केला होता.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग दोन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे आज चेन्नईच्या विमानतळावर मोठय़ा दणक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक कलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच भरतनाटय़मने पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग यांचे स्वागत करत प्राचीन वारसा असलेल्या महाबलीपुरम (मामल्लापुरम) मधील स्मारक, अर्जुनाचे तपस्या स्थळ, पंच रथ, शोर मंदिर याठिकाणी नेत त्यांचा ऐतिहासिक वारसा व माहिती सांगितली. दरम्यान, महाबलीपुरम आणि चीन 1700 वर्षांचे जुने संबंध आहेत. त्याबाबतही मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितले. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होणार आहेत.

भल्यामोठ्या शिळेसमोर सेल्फी

महाबलीपूरमध्ये बाराशे वर्षांपासून तब्बल 250 टन वजनाची भलीमोठी शिळा आहे. सहा मीटर लांब आणि पाच मीटर रूंदीच्या या प्राचीन शिळेसमोर दोन्ही नेत्यांनी सेल्फी घेतला. तसेच महाभारताशी संबंध असलेल्या पंच रथाची दोन्ही नेत्यांनी पाहणी केली. या रथासमोर त्यांनी फोटोसाठी पोझही दिली. सातव्या शतकात पल्लवा राजाने हा पंचरथ बनवल्याचे सांगितले जाते.

महाबलीपुरममधील प्राचीन वास्तूंची पाहणी केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी नारळपाण्याचा आस्वाद घेतला. कोणताही शिष्टाचार न बाळगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नारळ आणि टिश्शू पेपर जिनपिंग यांना दिला.

आपली प्रतिक्रिया द्या