पंतप्रधान मोदींचा मूड चांगला नाहीये! फोनवरील संभाषणातून माहिती मिळाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

1028

चीन आणि हिंदुस्थानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपण मध्यस्थीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली. मोदी यांचा मूड चांगला नसल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

ट्रम्प यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की “हिंदुस्थान आणि चीनमध्ये मोठा झगडा निर्माण झाला आहे.प्रचंड लोकसंख्या आणि ताकदवान सैन्य असलेले हे दोन देश आहेत. हिंदुस्थान खूश नाहीये आणि कदाचित चीनही खूश नाहीये. मी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललोय ते जे काही चालले आहे (हिंदुस्थान-चीनमधील तणाव) त्यामुळे चांगल्या मूडमध्ये नाहीयेत.” बुधवारी ट्रम्प यांनी या वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटबाबत छेडले असता ट्रम्प म्हणाले की जर हिंदुस्थान आणि चीनला मध्यस्थीमुळे मदत होईल असे वाटत असेल तर मी नक्की मध्यस्थी करेन. हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषेवर तणाव वाढला असून अमेरिका या प्रकरणी मध्यस्थी करायला तयार असल्याचे आपण या दोन्ही देशांना कळवले असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. हिंदुस्थानने अमेरिकेच्या मध्यस्थीबाबत गुरुवारीच भूमिका स्पष्ट केली होती की हा वाद ते सामंजस्याने आणि शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की दोन्ही देश हे सैन्य दलाच्या आणि दूतावासाच्या पातळीवर हा वाद कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही याच मार्गांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही देशांचे फिल्ड कमांडर्स हे प्रत्यक्ष भूमीवर चर्चा करून वाद निवळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चीननेही तडजोडीचा सूर आळवला असून दोन्ही देशांना एकमेकांचा धोका नसून या दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर केले पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या