एकामागून एक खराब निर्णयांमुळे 33 लाख लोकांचे प्राण गेले! देशांच्या हलगर्जीपणावर आंतरराष्ट्रीय तज्ञांचे ताशेरे

कोरोनाचा भयंकर फैलाव वेळीच रोखता आला असता. जागतिक आरोग्य संघटना देशांना आधीच अॅलर्ट करू शकली असती; परंतु एकामागून एक खराब निर्णय घेतले गेले. परिणामी, कोरोनाने आतापर्यंत तब्बल 33 लाख लोकांचे प्राण घेतले, जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या ‘आयपीपीपीआर’ गटाने देशांच्या हलगर्जीपणांवर ताशेरे ओढले आहेत.

आयपीपीपीआर हा महामारीची पूर्वतयारी व उपाययोजनांसंबंधी कार्यरत असलेला आंतरराष्ट्रीय तज्ञांचा स्वतंत्र वैश्विक गट आहे. या गटाने कोरोना महामारीसंबंधी अंतिम अहवाल बुधवारी प्रसिद्ध केला. हा अहवाल बनवण्यासाठी डब्ल्यूएचओच्या सदस्य देशांनी गेल्या वर्षी मे महिन्यात आयपीपीपीआरला विनंती केली होती. न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क आणि लायबेरियाचे माजी राष्ट्रपती एलेन जॉन्सन सरलीफ हे या गटाचे संयुक्त अध्यक्ष आहेत. कोरोनासारखी महामारी पुन्हा ओढवू नये यासाठी जगाला ‘अलार्म सिस्टम’मध्ये नव्याने भक्कम सुधारणा करण्याची गरज आहे, असेही अहवालात म्हटले आहे. तज्ञांनी महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या नुकसानीचा विविधांगी अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली आहेत.

तज्ञांनी सुचवलेले काही उपाय

जगातील सर्वात श्रीमंत देशांनी सर्वात गरीब देशांना कोरोना लसीचे 100 कोटी डोस द्यावेत. n श्रीमंत देशांनी आगामी महामारींशी लढण्याची तयारी करणाऱया विविध संघटनांना पुरेशी आर्थिक मदत करावी.n महामारीवर मात करण्यासाठी सर्वच देशांनी प्रामुख्याने कोरोना लसीकरण मोहिमेला गती द्यावी.

अहवालातील परखड निरीक्षणे

  • नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात अनेक देशांची सरकारे अपयशी ठरली आहेत. त्यात विज्ञान नाकारणाऱया नेत्यांनी जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास उडवला आहे.
  • सुरुवातीला चीनच्या वुहानमध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे 2020 च्या फेब्रुवारीत विषाणू जगभर पसरला.
  • कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी सुरुवातीला काही कार्यवाही केली गेली; पण दिरंगाई, अपयश आणि निर्णयांतील त्रुटींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला. अनेक देशांनी इशाऱयांकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
  • डब्ल्यूएचओने गेल्या वर्षी 22 जानेवारीलाच आरोग्य आणीबाणी घोषित करायला हवी होती;. परंतु डब्ल्यूएचओनेही या घोषणेसाठी आणखी 8 दिवसांचा वेळ काढला.
आपली प्रतिक्रिया द्या