हिंदुस्थानने T20 मालिका 4-1 ने जिंकली, अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हिंदुस्थानने 88 धावांनी जिंकून मालिका 4-1 अशी खिशात घातली. 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे हा सामना खेळला गेला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 7 बाद 188 धावा केल्या. त्यानंतर हिंदुस्थानने 15.4 षटकांत वेस्ट इंडिजला 100 धावांत गुंडाळले. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शामर ब्रूक्सने 13 धावा केल्या. तर हिंदुस्थानच्या रवी बिश्नोईने 2.4 षटकात 16 धावा देत 4 बळी घेतले. त्याचवेळी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

हिंदुस्थानकडून श्रेयस अय्यरने 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय दीपक हुडाने 38, संजू सॅमसनने 15, दिनेश कार्तिकने 12, इशान किशनने 11 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने तीन तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.