कश्मीरप्रश्नी मोदींनी मध्यस्थता करण्याची विनंती केली! डोनाल्ड ट्रम्प यांची लोणकढी थाप

27

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कश्मीरप्रश्नी मध्यस्थता करणार का’ असा आपल्याला प्रश्न विचारला होता असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यामध्ये एक टक्काही सत्य नसून ती त्यांनी मारलेली एक थाप होती असं स्पष्ट झालं आहे.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्त रवीश कुमार यांनी ट्विटरचा आधार घेत ट्रम्प यांनी केलेल्या विधानाबाबत हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट केली. ज्यात त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना मध्यस्थता करण्यासाठी कोणतीही विनंती केली नव्हती.

अमेरिकेच्या एका खासदाराने ट्रम्प यांचे हे विधान चुकीचे आणि लाज वाटायला लावणारे आहे अशा शब्दात टीका केली आहे. ब्रॅड शर्मेन असे या खासदाराचे नाव आहे. त्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांनी केलेले विधान ही मान खाली घालायला लावणारी चूक असल्याचं म्हटलं आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझी मदत मागितली होती. त्यामुळे मला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करायला आवडेल असे विधान केले होते.. त्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या सवयीप्रमाणे कश्मीरप्रशी रडगाणं गाऊन दाखवलंच. पाकिस्तानने अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, हिंदुस्थानने हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत कोणत्याही तिसर्‍या देशाला यामध्ये हस्तक्षेप करू देण्यास ठाम नकार दिला होता. ट्रम्प यांचे विधान खोटे असल्याचं सांगत असतानाच हिंदुस्थानच्या परराष्ट्र खात्याने कश्मीर प्रश्न हा त्रयस्थाच्या मध्यस्थीने नाही तर द्वीपक्षीय चर्चेनेच सोडवला जावा ही आपली भूमिका कायम असल्याचं ठणकावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या