
चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2021-2022 या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न दर म्हणजे जीडीपी हा 9.0 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जीडीपीबाबतचा पहिला अंदाज मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-2021 मध्ये जीडीपी हा उणे 7.3 इतका झाला होता. सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले हे आकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मूळ आधार म्हणून वापरले जाणार आहेत. सांख्यिकी कार्यालयाने म्हटलंय की चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात वाढीचा दर हा 3.9 टक्के इतका असेल गेल्या वर्षी हा दर 3.6 टक्के इतका होता. चालू आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर हा 12.5 इतका असेल. गेल्या आर्थिक वर्षात हा दर उणे 7.2 इतका झाला होता. खाणी (मायनिंग) क्षेत्राचा वाढीचा दर हा 14.3 टक्के इतका असेल असा अंदाज आहे, गेल्या आर्थिक वर्षात हा दर उणे 8.5 टक्के इतका झाला होता. गॅसपुरवठा, पाणीपुरवठा यासारख्या उपयोगी गोष्टींच्या पुरवठा क्षेत्राचा वृद्धी दर 8.5टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा दर 1.9 टक्के इता होता. एबीपी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जीडीपी म्हणजे काय ?
कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती ही त्या देशाच्या जीडीपीवरून म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरवली जाते. एका विशिष्ट काळात देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजे जीडीपी अशाही अर्थ लावला होता. जीडीपीचे आकडे दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध केले जातात. देशांतर्गत झालेलं उत्पादन आणि सेवां यांचाच जीडीपीचे आकडे निश्चित करताना विचार होतो. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्रांमधील उत्पादन वाढलं आहे अथवा घटलं आहे, हे पाहून जीडीपीचा दर ठरत असतो. जीडीपी वाढला म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाचा दर उंचावला असा ढोबळ मानाने अर्थ लावला जातो.