Asian Games 2023 – टीम इंडियाची ‘यशस्वी’ घोडदौड, नेपाळवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने नेपाळच्या संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. चीनमध्ये या स्पर्धा सुरू असून,हांगझाऊमधील पिनफेंग क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवण्यात आला होता. या स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाड याची हिंदुस्थानी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाणेफेक जिंकून त्याने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवर यशस्वी जायस्वालने अवघ्या धावांत चोपून काढत हिंदुस्थानी संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या काही षटकांत रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने नेपाळपुढे विजयासाठी 203 धावांचे आव्हान ठेवले होते. नेपाळचा संघ 20 षटकांत 179 धावाच करू शकला. या विजयामुळे टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचली आहे.

नेपाळच्या संघातर्फे दिपेंद्र ऐरे याने सर्वाधिक म्हणजे 32 धावा केल्या. कुशाल मल्ला आणि सलामीवीर कुशाल भुर्तेल यांनी प्रत्येकी 29 आणि 28 धावा केल्या. सुंदीप जोरा यानेही संघासाठी चिवट फलंदाजी करत 29 धावा केल्या मात्र नेपाळच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यामुळे त्यांचा डाव 179 धावांत आटोपला. टीम इंडियाच्या रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 3 बळी टीपले. अर्शदीप सिंगने 2 तर साई किशोर याने 1 बळी टीपला.