लंडनमधील डॉ. आंबेडकरांचे निवासस्थान ‘संग्रहालया’चा दर्जा गमावण्याच्या मार्गावर

204

हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान राष्ट्रीय संग्रहालयाचा दर्जा गमावण्याच्या उंबरठय़ावर आहे. लंडनच्या ‘दि कॅमडेन कौन्सिल’ या स्थानिक महापालिकेने विभागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर या घराचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र महाराष्ट्र सरकारने या निर्णयाविरोधात स्थानिक न्यायालयात धाव घेतली आहे. सिंघानिया आणि कंपनी ही आंतरराष्ट्रीय कायदेविषयक फर्म शासनाची बाजू न्यायालयात मांडणार आहे. या प्रकरणी  येत्या 24 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वर्षाचा निवास असलेले लंडनमधील हे घर सप्टेंबर 2015 मध्ये 22.5 लाख डॉलर्सना विकत घेतले होते. त्यानंतर त्या निवासस्थानाच्या नूतनीकरणावर 10 लाख डॉलर्स खर्च करण्यात आले होते. नूतनीकरणानंतर या चार मजली इमारतीवर या घराचे महत्त्व सांगणारा निळा फलकही लावण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना 1921 ते 1922 या काळात तेथे राहिले होते.

स्थानिकांचा विरोध का?

लंडन शहरात सायलेन्स झोनमध्ये असलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हे घर ऐतिहासिक ठेवा म्हणून जपण्यात येत आहे. या चार मजली निवासस्थानाचे महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक संग्रहालयात रूपांतर केले तेव्हापासून म्हणजे नोव्हेंबर 2015 पासून ते पाहण्यासाठी आंबेडकरभक्त नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. विशेषतः या निवासस्थानाला हिंदुस्थानी नागरिक मोठय़ा संख्येने भेट देत आहेत. त्यामुळे 2050 चौरस फूट जागेत वसलेले हे संग्रहालय अन्यत्र हलवून आपल्याला होत असलेला गर्दीचा त्रास दूर करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी ‘दि कॅमडेन कौन्सिल’ या स्थानिक महापालिकेकडे केली आणि महापालिकेने या निवासस्थानाचा संग्रहालय दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला. लंडनच्या नागरी वस्तीतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवास होता. या घरात ते केवळ दोन वर्षेच वास्तव्य करून होते. आमची शांतताच भंग पावलीय अशी तक्रार या निवासस्थानाजवळ 30 वर्षे वास्तव्य करणाऱया पीटर सिल्व्हरस्टेन या स्थानिक नागरिकाने केली आहे.

n डॉ. आंबेडकर यांचा निवास होता त्या घराला संग्रहालयाचा कायम दर्जा देणे हा ‘बरो’ भागातील स्थानिकांच्या मूलभूत अधिकारांवरील घालाच ठरेल. आंबेडकर यांच्या नावाने शहरात अन्यत्र संग्रहालय उभारावे, सध्या सुरू केलेल्या संग्रहालयाचे पुन्हा निवासी घरात रूपांतर करणेच योग्य ठरेल असे ‘दी कॅमडेन काऊन्सिल’चे योजना संचालक डेव्हीड जॉईस यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी दिली होती भेट

लंडनमधील डॉ. आंबेडकर यांचा निवास राहिलेल्या या ऐतिहासिक निवासस्थानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी भेट दिली होती. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाचे जतन करण्याच्या निर्णयाचा पाठपुरावा करण्याचे अभिवचनही दिले होते. डॉ. आंबेडकर यांच्या या निवासातील तळमजल्यावर असलेल्या दोन स्वागत कक्षांचे प्रदर्शन केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या