आगीशी खेळू नका, हिंदुस्थानचा ‘जी-7’मध्ये समावेश होण्याच्या भीतीने चीनला कापरे; दिली धमकी

13204

हिंदुस्थान आणि चीन लडाखमध्ये आमनेसामने आल्याने सीमेवर तणावाची स्थिती आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानचा समावेश जी-7 देशात करण्याची योजना आखल्याने चीनचा तिळपापड होत आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने याच संदर्भात एका चिनी अभ्यासकाचा हवाला देत हिंदुस्थानला धमीकवजा इशारा दिला आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह मिळून जी-7 चा विस्तार करून जी-11 किंवा जी-12 करण्यासाठी अनुकूल आहेत. जी-7 चा विस्तार करून त्यात सहभागी होण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न म्हणजे आगीशी खेळ आहे, असे या चिनी वृत्तपत्राने म्हटले.

जी-7 चा विस्तार भौगोलिक गणितावर आधारित असून याद्वारे चीनला चक्रव्यूहमध्ये घेरण्याचा प्रयत्न होत आहे. अमेरिका हिंदुस्थानला यात सहभागी करून घेण्यास उत्सुक आहे कारण हिंदुस्थान जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच हिंदुस्थान अमेरिकेकच्या इंडो-पॅसिपीक रणनीतीचा आधारस्तंभ बनला आहे. ट्रम्प यांच्या योजनेचा हिंदुस्थान भाग बनू इच्छितो यात आश्चर्यकारक काही नाही. कारण बऱ्याच काळापासून हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय मंचावर जागा पटकावण्याची महत्वकांक्षा आहे, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले.

सीमेवर तणाव असताना हिंदुस्थानने हे पाऊल म्हणजे चीनला एकप्रकारे शह देण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर चीनप्रति त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेसोबत आपली भागीदारी वाढवली आहे. हिंदुस्थान अमेरिकेच्या इंडो-पॅसिपीक रणनीतीचा भाग होऊ इच्छित आहे. या बदल्यात हिंदुस्थान अमेरिकेच्या सहाय्याने अधिक शक्तिशाली बनण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थान चीनला निशाणा बनवण्यासाठी अमेरिकेच्या अनेक योजनेत सहभागी झाला आहे.

हिंदुस्थानने चीनला दुष्मन मानणाऱ्या जी-7 सारख्या छोट्या गटात जाण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले जातील. हे हिंदुस्थानसाठी हितकारक नाही. सद्यस्थितीत दोन्ही देशाचे संबंध खराब आहेत. अशात ते आणखी ताणले जाऊन हिंदुस्थानने आगीशी खेळू नये, असा इशारा चीनने दिला.

आपली प्रतिक्रिया द्या