सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठी कारवाई करू, सेनाप्रमुखांनी ठणकावले

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीमेवर आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला सेनाप्रमुख बिपिन रावत यांनी ठणकावले आहे. सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर सक्षम असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना रावत यांनी, पाकिस्तानने या भ्रमात राहू नये की, सातत्याने हल्ले करूनही हिंदुस्थान मोठ्या प्रमाणात प्रतिकार करणार नाही. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत समजवण्यासाठी हिंदुस्थानी सैन्याकडे सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच हिंदुस्थानी सैन्य पाकिस्तानच्या सैन्यासारखे दुर्बळ नाही. जवानांचे शिर गोळा करण्याची हौस हिंदुस्थानी जवानांना नाही. मात्र याचा अर्थ आम्ही शांत राहू असा घेऊ नये, असेही रावत म्हणाले.

कश्मीरमध्ये उसळणाऱ्या हिंसाचाराबद्दल रावत म्हणाले, हिंदुस्थानी जवान कश्मीरी युवकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी तरुणांची डोकी भडकवली आहेत. १२-१३ वर्षांची मुलेही दगडफेक करत आहेत. कश्मीरमध्ये शांततेसाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. हुर्रियत नेत्यांशी चर्चा करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना रावत यांनी, आम्ही अशा व्यक्तीसोबत चर्चा करू जे आम्हाला कश्मीरमध्ये शांततेची हमी देतील, असे उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या