‘फेसलेस’ करप्रणाली; भ्रष्टाचाराचे मार्ग बंद, देशात केवळ दीड कोटी करदाते

1045

भ्रष्टाचाराचे मार्ग बंद करण्यासाठी करप्रणालीत पारदर्शकता आणण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फेसलेस अपील असेसमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेअर चार्टर या सुविधांची घोषणा केली आहे. दरम्यान, हिंदुस्थानात 130 कोटींपैकी केवळ दीड कोटी जनता कर भरते. यावर सर्वांनी चिंतन केले पाहिजे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशात सध्या केवळ दीड कोटी लोक कर भरत आहेत. आत्मनिर्भर हिंदुस्थानसाठी यावर सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. लोकांनी प्रामाणिकपणे पुढे येवून कर द्यावा. राष्ट्र उभारणीमध्ये आपला वाटा उचलावा असे अवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. टॅक्स रिटर्न भरणाऱयांची संख्या अडीच कोटींनी वाढली आहे. पण 130 कोटींच्या लोकसंख्येत ही वाढ खूप कमी आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?

  • वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी पारदर्शक करप्रणालींसाठी नवे व्यासपीठ असणार आहे.
  • ओळख विरहित अर्थात फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्स पेअर चार्टर या सुविधा सुरू होतील. फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपिल तत्काळ सुरू होईल. टॅक्स पेअर चार्टरची 25 सप्टेंबरपासून अंमलबजावणी होईल.
  • प्रामाणिक करदाते देशात आहेत. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान आहे. करदात्यांना सुविधा देणे हे सरकारचे काम आहे. आज तीन सुविधांमुळे करप्रणाली पारदर्शक आणि गतीमान होईल.
    काय आहे ‘फेसलेस’ करप्रणाली?
  • करदात्याला नोटीस पाठविण्यासाठी एक केंद्रीय कॉम्प्युटर सिस्टीम असेल. ही सिस्टीम छाननी करेल. करदात्याच्या तक्रारींची दखल घेतली जाईल. प्रामाणिक करदात्यांसाठी सन्मानासाठी ही योजना आहे. प्रामाणिक करदात्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.
  • आयकराची नोटीस आल्यानंतर करदात्यांना तडजोडीसाठी आयकर विभागात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. करदाते आणि अधिकारी यांच्यात कोणताही संपर्क होणार नसल्याने तडजोडीचे जुगाड होऊन भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाही.
आपली प्रतिक्रिया द्या