सामन्यादरम्यान सिराज व बुमराहवर वर्णभेदी टीका, बीसीसीआयने दाखल केली तक्रार

टीम इंडिया व ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना सिडनीतील मैदानावर सुरू आहे. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या काही चाहत्यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर वर्णभेदी टीका केली. या प्रकरणी बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार नोंदविली आहे.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया क्षेत्ररक्षण करत असताना दारु पिऊन तर्राट असलेल्या काही प्रेक्षकांनी बुमराह व सिराजवर अभद्र भाषेत टिका टिपण्णी केली. त्यानंतर तत्काळ कर्णधार अजिंक्य रहाणेने पंचाना याबाबत कळवले. ‘चाहते करत असलेली टिका ही अत्यंत अपमानजनक असल्याचे रहाणेने पंचांना सांगितले.

ऑस्ट्रेलियाची 195 धावांची आघाडी 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा 2 बाद 96 वर असलेली टीम इंडिया काही तासातच ऑलआऊट झाली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फंलदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत 197 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 2 बाद 103 धावांवर होती. सध्या मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ मैदानावर आहेत. दोघांचाही चांगला जम बसला असून चौथ्या दिवशीही जर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगले खेळले तर टीम इंडियासाठी ही धोक्याची बाब असेल.

तिसऱ्या दिवशी अवघ्या 148 धावात टीम इंडियाचे आठ खेळाडू बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली 94 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाच्या 244 धावांमध्ये शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकं आहेत. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आश्वासक सलामी देऊनही मधल्या फळीतील चेतेश्वर पुजारा सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या