राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात 1 जूनपासून मासेमारी बंदी

462

महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात 1 जून ते 31 जुलै हा 61 दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान केंद्रीय मत्स्य विभागाच्या नव्याने काढलेल्या आदेशानुसार 14 जुुन पर्यंत राष्ट्रीय सागरी हद्दीत 12 नॉटिकल मैल क्षेत्राबाहेर मासेमारीस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला तरी पोषक समुद्री हवामान असल्यास राष्ट्रीय हद्दीत मासेमारीसाठी मच्छिमारांना संधी असणार आहे.

गेली काही वर्षे मच्छिमार बांधव वादळे, समुद्री आपत्ती, अनधिकृत व बेसुमार मासेमारी या संकटात असून मत्स्यदुष्काळ स्थितीचा सामना करत आहे. त्यात यावर्षी गेले तीन महिने कोरोना आपत्ती असून त्याचाही काही परिणाम मासेमारीवर झाला आहे. आता मासेमारी बंदी कालावधीत यावर्षी केंद्र व राज्य यांच्या वेगवेगळ्या धोरणामुळे 14 जून पर्यंत बंदी कालावधी बाबत मच्छिमार संभ्रमात आहेत.

मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे. मात्र बिगर यांत्रिक बोट मासेमारीला खाडी तसेच अन्यत्र हवामान शांत असताना परवानगी आहे. असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर बंदी कालावधीचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे.

घटते मत्स्योत्पादन आणि राज्या-राज्यातील सागरी हद्दीमध्ये घुसखोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात पश्चिम किनाऱ्यावर 1 जून ते 31 जुलैपर्यंत समान मासेमारी बंदी कालावधी लागू केला. पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. माशांच्या या प्रजनन कालावधीत अंड्यांवरील मासे पकडले गेल्यास मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजाचा नाश होतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून बंदी कालावधी लागू करण्यात येतो. मात्र केंद्राने मत्स्य बंदी कालावधी कमी केल्याने महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समितीने विरोध केला आहे.

कोकण किनारपट्टीवर अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी मच्छीमारांना 1 जून पासून मासेमारी बंदी पाळणे बंधनकारक आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येईल असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.

एलईडी व परप्रांतीय बोटींची घुसखोरी वाढली

पर्ससीन मासेमारीवर निर्बंध, एलईडी लाईट मासेमारी बंदी हे धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वंतत्र यंत्रणा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे एलईडी व परप्रांतीय बोटींची घुसखोरी वाढली. अनधिकृत पध्दतीने मासळीची लूट मोठ्या प्रमाणात सुरू राहिली. अश्या स्थितीत नव्या हंगामात मासेमारी अधिनियम कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा मच्छिमार बांधवांकडून व्यक्त होत आहे.

कोकण किनारपट्टीवर चक्री वादळाचा धोका

हिंदुस्थानच्याच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून 1 जून ते 6 जून या कालावधीत कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका नाकारता येत नाही. तरी मच्छिमार व किनारपट्टीवरील बांधवांनी सतर्क राहावे. असे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या