देशाला आणखी चार मोठय़ा बँकांची गरज, अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचे मत

देशात केवळ बँकांची संख्या वाढून उपयोग नाही तर एसबीआयसारख्या आणखी चार-पाच मोठय़ा बँका असणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनच्या 74व्या वार्षिक बैठकीत त्या बोलत होत्या.

सध्या देशाची अर्थव्यवस्था नव्या दिशेने वाटचाल करत असून बँकिंग सेवेची गरज वाढत आहे. तसेच बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. याचा विचार करता पुढील काळात देशात नुसती बँकांची संख्या वाढून उपयोग नाही तर वाढत्या गरजा पूर्ण करणाऱया स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या चार-पाच बँका उभ्या राहणे अवश्यक असल्याचे अर्थ मंत्र्यांनी सांगितले. तसेच बँकिंग क्षेत्राचा विस्तार झाल्यास गरजूंना भांडवल उपलब्ध होऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या. बँकांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या गरजा समजून त्या पूर्ण करायला हव्यात. त्यामुळे देशाची निर्यात 400 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकेल, असेही त्यांनी सांगितले. देशातील ज्या जिह्यांतील भागांमध्ये एकही बँक नसेल, तेथे बँकींग सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बँकांनी तळागाळात पोहचावे

आजही देशातील अनेक नागरिक बँकिंग क्षेत्रापासून दूर आहेत. त्यांना आपल्या कार्यकक्षेत आणण्यासाठी बँकांनी तळागाळात पोहचावे. त्यासाठी स्वतंत्र मॉडेलची गरज आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचा स्तर उंचावणार असून सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होऊ शकेल, असे मत अर्थ मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या