आधी विश्वास जिंका, त्यानंतरच चर्चा शक्य; हिंदुस्थानने नेपाळला सुनावले

1442

चीनने फूस लावल्यामुळे नेपाळने त्यांच्या देशाच्या नकाशात बदल करत हिंदुस्थानचा काहीभाग त्यांच्या देशात दाखवला. मात्र, या नव्या नकाशाला नेपाळच्या संसदेतच मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या नेपाळने हिंदुस्थानशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. चीनच्या सांगण्यावरून हिंदुस्थानला डिवचणे नेपाळला आता महगात पडत आहे. त्यामुळे चर्चेसाठी नेपाळ उतावीळ झाला आहे. मात्र, आधी विश्वास जिंका, त्यानंतरच चर्चा शक्य असल्याचे हिंदुस्थानने नेपाळला सुनावले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही देशातील विश्वासला तडा गेला आहे. त्यामुळे चर्चेसाठी पोषक आणि विश्वासाचे वातावरण नेपाळने तयार करण्याची गरज असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे.

कालापानी सीमाभागाबाबत हिंदुस्थानशी परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा करण्यासाठी नेपाळ जोर देत आहे. तसेच नव्या नकाशाला मंजुरी मिळवण्यासाठी घटनेत सुधारणा करण्याची तयारीही सुरू आहे. नेपाळमधील के.पी. ओली सरकार नव्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी अद्याप संसदेत विधेयक सादर करू शकलेले नाही. यावर विचारविनिमय करण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसने वेळेची मागणी केली आहे. तर मधेशी समुदायाने आपल्या मागण्यांचा प्रस्तावित सुधारणेत विचार करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे विधेयक लांबणीवर पडणार आहे.

या सर्व प्रकरणामुळे दोन्ही देशातील मैत्री आणि विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे चर्चा सुरू करण्यासाठी नेपाळने विश्वासाचे आणि चर्चेसाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज हिंदुस्थानने व्यक्त केली आहे. सध्या निर्माण झालेला तणाव हा मुद्दा गंभीर आहे. शेजारी देशांशी विश्वास, शांतता आणि सामंजस्याचे संबंध ठेवण्यावर हिंदुस्थानचा भर असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. दोन्ही देशात चांगले संबंध राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे असते, असेही हिंदुस्थानने म्हटले आहे. नेपाळशी हिंदुस्थानचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कोरोनाच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानकडून नेपाळला औषधांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असल्याचेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. मात्र, आता चर्चेसाठी नेपाळने विश्वासाचे वातावरण तयार करावे, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या