आशिया चषकाचे फिफ्टी-फिफ्टी आयोजन; हिंदुस्थानचे सामने तटस्थ ठिकाणी

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळायला येण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात बैठक होऊन यावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. हिंदुस्थानी संघाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवून उर्वरित आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात घ्यायची, अशी ‘एसीसी’ची योजना आहे.

‘क्रिकइन्फा’s या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे. आशिया चषक स्पर्धा 2 ते 17 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. स्पर्धेतील बहुतांश सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. मात्र, हिंदुस्थानी संघाचे सर्व सामने यूएई, ओमान किंवा श्रीलंका यापैकी कोणत्याही एका ठिकाणी स्थलांतरित केले जाऊ शकतात. या स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी 3 वेळा एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. यावेळी आशिया कप सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. 13 दिवस चालणाऱया या स्पर्धेत 6 संघांमध्ये अंतिम सामन्यासह एकूण 13 लढती होतील. हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. पात्रता फेरीतील एक-एक संघ या गटात दाखल होईल. दुसरीकडे श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱया गटात आहेत.

तर टीम इंडिया खेळणार 6 सामने

आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानी संघ गट फेरीत 2 सामने खेळणार आहे. एकच सामना जिंकल्यानंतर संघ सुपर-4 टप्प्यांत पोहोचेल. या फेरीत टीम इंडियाला 3 सामने खेळावे लागतील. जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळेल. हिंदुस्थानी संघाने अंतिम फेरीत धडक मारल्यास तो सामनाही तटस्थ ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजेच, स्पर्धा आयोजकांना 13 पैकी 6 लढती या तटस्थ ठिकाणी खेळवाव्या लागतील. स्पर्धेच्या आयोजनासाठी यूएई, ओमान आणि श्रीलंकेबरोबर इंग्लंडचेही नाव तटस्थ ठिकाणासाठी घेण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला क्रिकेटप्रेमी मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. मात्र, इंग्लंडला यजमानपद मिळेल असे वाटत नाही.