पाकिस्तानचा तोच डाव

18

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

१९६५ च्या हिंदुस्थान-पाक युद्धात हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या तिन्हीही अंगांचा पूर्ण पराभव केला होता. या लढाईत हिंदुस्थानचे २८६२ तर पाकिस्तानचे ५८०० सैनिक ठार झाले होते. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानचा १९२० चौ. किलोमीटर प्रदेश जिंकला होता तर पाकिस्ताननेही ५४० चौ. किलोमीटर प्रदेश काबीज केला होता. हिंदुस्थानचे १०० तर पाकिस्तानचे ४५० टँक्स निकामी झाले होते. अर्थात असा निर्णायक पराभव होऊनसुद्धा ताश्कंदसारख्या युद्धकरारात ‘युद्धात जिंकले, पण तहात हरले’ अशी स्थिती हिंदुस्थानची झाली होती. पुढे १९७१ च्या युद्धात हिंदुस्थानने पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) हा पाकिस्तानपासून मुक्त केला आणि पाकिस्तानचे एक लाख सैनिक युद्धकैदी बनविले. १९४७ च्या फाळणीनंतर कारगील युद्धापर्यंत आमने-सामने युद्धात चार वेळा पाकिस्तानचा निर्णायक पराभव होऊन पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही जिरली नाही. उलट प्रखर सूडभावना म्हणून १९६५ची युद्धजन्यपूर्व परिस्थिती ते उभी करीत आहेत. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान अयुब खान यांनी ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ नावाखाली मुलकी वेशात पाकिस्तानी सैनिक कश्मीरमध्ये घुसविले होते आणि कश्मीरमधील जनता हिंदुस्थानविरुद्ध असल्याचे चित्र उभे केले. त्यात यश न आल्यामुळे अयुब खान यांनी संपूर्ण पाक सीमेवर युद्ध पुकारले. त्यात हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याची इतकी ससेहोलपट केली की, थेट लाहोर या राजधानीच्या शहरात हिंदुस्थानी सैन्य घुसले, जगात सर्वाधिक गुरुद्वारा असलेले शहर हिंदुस्थानच्या ताब्यात आल्यानंतर हिंदुस्थानात आनंद व अभिमान पसरला, परंतु तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन तत्कालीन रशियाचे प्रमुख कोसिजिन यांनी अमेरिका व चीनच्या सहाय्याने या युद्धात समझोता घडवून आणला. त्यानुसार हिंदुस्थानला जिंकलेला प्रदेश सोडावा लागला. तशीच परिस्थिती सध्याचे पाकिस्तानी लष्कर पुन्हा कश्मीरात अवलंबित आहे. अर्थात त्याला त्यांचा मित्र चीन फूस देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या