एका व्यक्तीमुळे हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध खराब, आफ्रिदीची धुसफूस

1802

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मालिका बंद करण्यात आली. पाकिस्तानने 2012 मध्ये एक दिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा दौरा केला होता. त्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून दोन्ही देशांनी एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.

हिंदुस्थान सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही असा पवित्रा बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केला आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये मालिका होत नसल्याने डबघाईला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि पाकिस्तानी खेळाडू वेगवेगळे विधानं करून हिंदुस्थानला उकसावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आताही पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने एक विधान केले असून जोपर्यंत पंतप्रधान मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत हिंदुस्थान-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार नाही, असे म्हटले आहे.

मोदी सत्तेत असेपर्यंत कश्मीर प्रश्न सुटणार नाही

एका मुलाखतीमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, मला नाही वाटत जोपर्यंत मोदी सत्तेत आहे तोपर्यंत द्विपक्षीय मालिकेसाठी हिंदुस्थानकडून कोणतेही पाऊल उचलेल जाईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मोदींची विचारधारा काय आहे. त्यांची विचारधारा नकारात्मक आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील खराब संबंधाला एक व्यक्ती जबाबदार आहे. एका व्यक्तीमुळे दोन्ही देशांचे संबंध खराब झाले आहेत, असेही तो म्हणाला.

आफ्रिदी पुढे म्हणाला की, हिंदुस्थान आणि पाकिस्तानधील लोकं एकमेकांच्या देशामध्ये जाऊ इच्छितात. परंतु मला माहिती नाही की मोदींना नक्की काय हवे आहे, त्यांचा अजेंडा काय आहे? तो पुढे म्हणाला की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठ्या मेहनतीने देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू केले आहे. जगभरातील प्रत्येक संघ आता पाकिस्तानात येतील. आशा करतो हिंदुस्थानही नक्की येईल, असेही आफ्रिदी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या