हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार की नाहीत हे मोदींना अन् खान यांना विचारा!

750

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने हे सरकारच्या परवानगीने ठरविले जातात. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने होणार की नाहीत, ते तुम्ही नरेंद्र मोदी आणि इम्रान खान या उभय देशांच्या पंतप्रधानांच विचारा, अशी सावध प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’चा होणारा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरभ गांगुली याने दिली.

कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरभ गांगुली म्हणाला, हिंदुस्थान-पाकिस्तान संघादरम्यान क्रिकेट सामने होणार की नाही, याचे माझ्याकडे उत्तर नाहीये. सरकारची परवानगी असल्याशिवाय उभय देशांत क्रिकेट सामने होऊ शकत नाही. त्यामुळे पत्रकारांनी याबाबत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाच विचारले पाहिजे, असे सौरभ गांगुलीने सांगितले.

हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान सात वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. 2012 मध्ये उभय देशांमध्ये अखेरची मालिका खेळली गेली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ हिंदुस्थानी दौऱ्यावर आला होता. त्यानंतर फक्त ‘आयसीसी’ आणि आशियाई स्पर्धांमध्येच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडलेले आहेत.

धोनीच्या भविष्याचा फैसला लवकरच
24 ऑक्टोबरला माझी संघनिवड समितीशी बैठक होईल. त्यावेळी संघनिवड समितीला महेंद्रसिंग धोनीबद्दल काय वाटते हे मला आधी जाणून घ्यावे लागेल. संघनिवड समितीचे अध्यक्ष व ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली यांच्याशी मी धोनीबाबतच्या योजनेबद्दल चर्चा करेन. सर्व माहिती घेतल्यानंतरच मी धोनीच्या भविष्याबद्दल बोलू शकेल’, असे सौरभ गांगुलीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या