कश्मीरातील कर्फ्यू हटताच तिथे रक्ताचे पाट वाहतील – इम्रान खान

1367

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकीकडे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला शांततेचा संदेश दिला, मात्र त्यानंतर भाषणाला उभे राहिलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगापुढे आपला दहशतवादी चेहराच दाखवून दिला. जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्याची खदखद बाहेर काढताना इम्रान यांनी कश्मीरमधील कर्फ्यू हटताच तिथे रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे दिली.

नरेंद्र मोदी यांनी जगापुढील दहशतवादाचे आव्हान संपुष्टात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या महासभेतही त्यांनी दहशतवाद संपवण्याचा निर्धार बोलून दाखवला. दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची साद त्यांनी दिली. मात्र मोदींच्या भाषणाने अंगाचा तीळपापड झालेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगाला दाखवून दिला. भाषणात ते म्हणाले की, हिंदुस्थानने कश्मीरात संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाविरोधात काम केले आहे. कश्मीरमध्ये कोणताच विचारविनिमय न करता कलम 370 हटवण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. हिंदुस्थान 350 दहशतवादी मारल्याचा दावा करतेय, मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आहे अशी उलटी बोंबही इम्रान यांनी मारली. हिंदुस्थानला त्यांचा पायलट परत केला तर ते आम्हाला कमजोर समजू लागले अशा शब्दांत हिंदुस्थानवर आगपाखड करतानाच इम्रान यांनी पाकिस्तानच शांतीचा पुरस्कर्ता असल्याचा अजब दावा केला. आम्ही दहशतवादाविरोधात पावले उचललीत असे हास्यास्पद विधान त्यांनी भाषणात केले.

आंतरराष्ट्रीय समुदायापुढे इम्रान खान यांचा पुन्हा थयथयाट, पुलवामासारख्या हल्ल्याची पुन्हा धमकी

नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडला. त्यावर इम्रान खान यांनी हिंदुस्थानला पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवून आणू अशी धमकी दिली. हिंदुस्थानने पुलवामा हल्ल्यासाठी आम्हाला दोषी ठरवले. हल्ल्याचे पुरावे देण्याऐवजी आमच्यावर बॉम्बचा मारा केला अशी उलट बोंब इम्रान यांनी मारली.

आपली प्रतिक्रिया द्या