इथेही मंदीच्या झळा! देशांतर्गत विमान प्रवासी केवळ 4 टक्क्यांनी वाढले

348

गेल्या वर्षभरात विमानाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत केवळ 3.74 टक्क्यांनी वाढ झाली. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी ही आकडेवारी जाहीर करीत याबाबत निराशा व्यक्त केली. आर्थिक मंदीचे संकट, जेट एअरवेजची बंद पडलेली सेवा अशा कारणांमुळे प्रवासी संख्येला उतरती कळा लागल्याचे उघड झाले आहे.

2018 मध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत 18.60 टक्क्यांची वाढ झाली. मात्र पुढील वर्षभरात हा टक्का थेट 3.74 वर ढेपाळल्याने डीजीसीए चक्रावून गेली आहे. गेल्या वर्षभरात एकूण 14 कोटी 41 लाख प्रवाशांनी विमानाने देशांतर्गत प्रवास केला, तर 2018 मध्ये 13 कोटी 89 लाख प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला होता. डिसेंबर 2018 च्या तुलनेत डिसेंबर 2019 मध्ये प्रवासी संख्येत 2.56 टक्क्यांची वाढ होऊन ती 1.30 कोटींवर गेल्याचे डीजीसीएच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

  • जेट एअरवेज बंद पडल्यामुळे गेल्या वर्षात देशांतर्गत विमान वाहतुकीच्या बाबतीत थोडी निराशा झाली आहे. नवीन वर्षात परिस्थिती बदलेल आणि पुन्हा प्रवासी संख्येत दुहेरी अंकाने वाढ होईल, अशी आशा डीजीसीएने व्यक्त केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या