हिंदुस्थानला विजयासाठी हवेत आठ बळी, पुजाराचा डबल धमाका, साहाचे शानदार शतक, जाडेजा प्रभावी

20
चेतेश्वर पुजारा

सामना ऑनलाईन, रांची

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीच्या साहसाचे कौतुक करण्याऐवजी त्याच्या दुखापतीची खिल्ली उडवून हिंदुस्थानी फलंदाजांचे लक्ष विचलित करण्याचा माइंड गेम खेळला. मात्र चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर अभेद्य भिंतीप्रमाणे उभा राहिला अन् वृद्धिमान साहाने त्याला बहुमोल साथ दिल्याने कांगारूंचे मनसुबे उधळले गेले. पुजाराने कांगारूंच्या नाकावर टिच्चून द्विशतकी धमाका केला, तर साहाने शतकी खेळी करून हिंदुस्थानच्या फलंदाजीतील खोली दाखवून दिली. या दोघांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने २१० षटकांत ९ बाद ६०३ धावांचा डोंगर उभारून पहिला डाव घोषित केला. पहिल्या डावात १५२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात उर्वरित ७.२ षटकांच्या खेळात २३ धावा करताना २ फलंदाज गमावले. आता रांची कसोटी जिंकून मालिकेत २-१ ने पुढे होण्यासाठी टीम इंडियाला आठ बळी टिपण्याची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मॅट रेनशॉ ७ धावांवर खेळत होता.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज बाद करणारा रवींद्र जाडेजा अर्थात ‘जाडू’ची जादू दुसऱ्या डावातही बघायला मिळाली. त्याने वन डे स्टाइल फलंदाजी करणाऱया डेव्हिड वॉर्नरचे (१४) दांडके उडवून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रात्रीचा रखवालदार म्हणून आलेल्या नाथन लायनचाही जाडेजानेच त्रिफळा उडवून कांगारूंना दुसरा हादरा दिला. त्यामुळे हिंदुस्थानच्या विजयाची गुरुकिल्ली खऱ्या अर्थाने फिरकी गोलंदाजांच्याच हाती असेल.
हिंदुस्थानने रविवारी सकाळी ६ बाद ३६० धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली तेव्हा चेतेश्वर पुजारा १३०, तर वृद्धिमान साहा १८ धावांवर होते. या जोडीने चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना निप्रभ ठरविले. पुजाराने कारकीर्दीतील तिसरे कसोटी द्विशतक झळकावताना ५२५ चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत २१ चौकार लगावले. साहाने २३३ चेंडूंत ११७ धावांची खेळी साकारताना एका षटकारासह ८ चौकार ठोकले. या दोघांनी सातव्या गड्यासाठी १९९ धावांची भागीदारी केली. नाथन लायनने पुजाराला मॅक्सवेलकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. मग स्टीव्ह ओ’किफने तिसरे कसोटी शतक झळकावणाऱया साहाला मॅक्सवेलकरवीच झेलबाद केले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने ५५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी करून हिंदुस्थानला सहाशेचा टप्पा ओलांडून दिला.

सचिन-लक्ष्मणची बरोबरी करून पुजारा द्रविडच्या पुढे
चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा आपणच राहुल द्रविडचा वारसदार असल्याचे दाखवून दिले. या तंत्रशुद्ध फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन द्विशतके झळकावून सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांची बरोबरी केली. कारण आतापर्यंत तेंडुलकर व लक्ष्मण या दोघांनीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-२ द्विशतके ठोकली होती. रविवारी पुजारा या पंक्तीत जाऊन बसला. याचबरोबर पुजाराने २०२ धावांच्या खेळीत ५२५ चेंडूंचा सामना करून सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या बाबतीत राहुल द्रविडलाही पिछाडीवर टाकले. एका खेळीत पाचशेहून अधिक चेंडू खेळणारा पुजारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला. याआधी राहुल द्रविडने २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४९५ चेंडूंचा सामना केला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या