पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र; हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांचे वेधले लक्ष

782

हिंदुस्थानने दहशतवादाच्या गंभीर समस्येकडे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तान दहशतवादाचे आश्रयस्थान आहे. पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असून तिथे 40 हजारपेक्षा जास्त दहशतवादी असल्याचे संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले. परदेशात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा हवालाही तिरुमूर्ती यांनी दिला आहे. पाकिस्तानातील दहशतवादीच अफगाणिस्तानात घातपात घडवत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तान दहशतवदाला प्रोत्साहन देत असल्याचे जगाला माहित आहे. काळ्या यादीत टाकलेले दहशतवादी, तसेच जमात उद दावा, लश्कर ए तोयबा,जेईएम आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तान आश्रयस्थान आहे. या संघटनेची प्रशिक्षण शिबीरेही पाकिस्तानात आहेत. परदेशात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे संयुक्त राष्ट्रांना आढळून आले आहे. त्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात करण्यात आला आहे. त्याचा हवाला तिरुमूर्ती यांनी दिला आहे. विविध दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे. अल कायदाचा म्होरक्या पाकिस्तानचा नागरिक आहे, त्यावरून पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन, आश्रय आणि वित्त पुरवठा करत असल्याचे स्पष्ट होतो, असे तिरुमूर्ती म्हणाले.

पाकिस्तानातील जेईएम आणि लश्कर ए तोयबाचे दहशतवादी अफगाणिस्तानात घातपात घडवत आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानात सुमारे 40 हजार दहशतवादी असल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दिल्याचेही तिरुमूर्ती यांनी स्पष्ट केले.अफगाणिस्तानात सुमारे 10 हजार पाकिस्तानी दहशतवादी आहेत. ते सर्व जगासाठीच धोकादायक आहे. जम्मू कश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हिंदुस्थानने हाणून पाडत पाकिस्तानचे दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण जगाला घातक असल्याचे स्पष्ट करत संयुक्त राष्ट्रांचे याकडे लक्ष वेधले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या