हिंदुस्थानने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केल्यास प्रत्युत्तर देऊ; पाकड्यांची पोकळ धमकी

28

सामना ऑनलाईन। लाहोर

जम्मू-कश्मीरमधील सुंजवान लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर पाकडे चांगलेच टरकले आहेत. या हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे. म्हणूनच हिंदुस्थानने जर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केले तर त्याला योग्य प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकी पाकिस्तानने दिली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले असून यात हिंदुस्थानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हिंदुस्थानमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा कुठलाही ठोस पुरावा नसताना हिंदुस्थानी अधिकारी त्या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवतात. यामुळे हिंदुस्थानने नियंत्रणरेषेच्या पलीकडे हल्ले करू नयेत नाहीतर त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल, असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तसेच कश्मीरमध्ये हिंदुस्थान मानवी हक्काच उल्लंघन करत असल्याचा आरोपही पाकड्यांनी केला आहे.

जम्मू-कश्मीरमधील सुंजवानमध्ये दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे ५ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. अशाच प्रकारचा हल्ला उरीतील लष्करी तळावर झाला होता. त्यानंतर कुठलाही तपास न करता हिंदुस्थानने सर्जिकल स्ट्राईक केलं, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे. तो अनुभव पाहता सुंजवान हल्ल्यानंतरही हिंदुस्थानकडून तसा हल्ला होण्याची शक्यता असल्याचं पाकिस्तानने म्हटल आहे. पण त्यास योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल अशी धमकी या निवेदनात पाकिस्ताननं दिली असून यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानने गळ घातली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या