लेफ्टनंट उमर फयाझचा फोटो दाखवून हिंदुस्थानचे पाकड्यांना प्रत्युत्तर

35

सामना ऑनलाईन। जिनिव्हा

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पॅलेस्टिनी तरुणीचा फोटो दाखवून हिंदुस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला हिंदु्स्थानने जशास तसे उत्तर दिले आहे. हिंदुस्थानच्या राजदूत पौलोमी त्रिपाठी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत शहीद लेफ्टनंट उमर फयाज यांचा फोटो दाखवला. ज्या क्रूरपणे दहशतवाद्यांनी फयाझ यांची हत्या केली हाच खरा पाकिस्तानचा चेहरा आहे, जवानांना दहशतवाद्यांकडून किती यातना दिल्या जातात याचे हे खरे फोटो आहेत खोटे नाही असे सांगत त्रिपाठी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले होते. यास राईट टु रिप्लाय देताना पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी एका जखमी तरुणीचा फोटो झळकवला होता. हिंदुस्थानच्या सुरक्षा दलाकडून अशाप्रकारे कश्मीरींवर अत्याचार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण तो फोटो कश्मीरी तरुणीचा नसून एका पॅलेस्टाईन तरुणीचा असल्याचे उघड झाल्याने पाकिस्तानचा खोटरडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला.

यापार्श्वभूमीवर त्रिपाठी यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तान दहशतवाद्यांचा आंतरराष्ट्रीय अड्डा झाला आहे. हिंदुस्थानची प्रतिमा खराब करण्यासाठीच पाकिस्तानने खोटा फोटो दाखवल्याच त्या म्हणाल्या. उमर फयाझ ड्युटीवर नसतानाही दहशतवाद्यांनी एका लग्नसमारंभातून त्यांचे अपहरण केले व त्यांची हत्या केली. अशाचप्रकारे पाकिस्तानी दहशतवादी जवानांना यातना देतात. पण पाकिस्तान त्यावर कधीच काही बोलणार नाही असे सांगत त्रिपाठी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.

आपली प्रतिक्रिया द्या