हिंदुस्थानचे टी-20 वर्ल्ड कप मिशन आजपासून; दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

755

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपचे मिशन आजपासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानदक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रविवारपासून तीन सामन्यांच्या ट्वेण्टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून धरमशाला येथे पहिला सामना रंगणार आहे. पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आल्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा होऊ शकते. यावेळी हिंदुस्थानचा युवा संघ वि. दक्षिण आफ्रिकेचा नवा संघ अशी लढत असणार आहे. क्विंटॉन डी कॉकची सेना विराट कोहलीच्या ब्रिगेडचे आव्हान कसे परतवून लावते हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे.

संभाव्य संघ खालीलप्रमाणे

हिंदुस्थान रोहित शर्मा, शिखर धवन/लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, रवींद्र जाडेजा/राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका क्विंटॉन डी कॉक (कर्णधार, यष्टिरक्षक), रिझा हेन्ड्रीक्स, तेम्बा बवुमा, रॅसी वॅन डर डय़ुसेन, डेव्हिड मिलर, आंदिल पेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, बोर्न फॉर्चुन/ऍनरीच नॉर्थजे, कॅगिसो रबाडा, ज्युनियर डाला, तबरेज शम्सी.

13 महिन्यांचा काळ महत्त्वाचा

विराट कोहली ऍण्ड कंपनीला ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज होण्यासाठी 13 महिन्यांचा अवधी आहे. यामध्ये जवळपास 20 ट्वेण्टी-20 सामने व आयपीएलचा समावेश आहे. यामधून हिंदुस्थानला प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी संघ निवडता येणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघ नव्या खेळाडूंना संधी देत आहे. क्विंटॉन डी कॉक, डेव्हिड मिलर, कॅगिसो रबाडा यांच्याखेरीज संघात अधिकाधिक युवा खेळाडू आहेत.

या आकडेवारीवर एक नजर

  • ज्युनियर डाला या गोलंदाजाने हिंदुस्थानचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याला ट्वेण्टी-20 क्रिकेटमध्ये अवघ्या 20 चेंडूंच्या मोबदल्यात तीन वेळा बाद केले आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करील यात शंका नाही.
  •  वॉशिंग्टन सुंदरने 2017 साली पदार्पण केले. तिथपासून त्याने पॉवर प्लेमध्ये 9 फलंदाज बाद केले आहेत. पॉवर प्लेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त फलंदाज बाद करण्याची किमया अकिला धनंजया, डेव्हिड विली व बिली स्टेनलेक यांनी केलीय, मात्र या सर्वांनीच त्याच्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या