हिंदुस्थानचे लक्ष्य ‘व्हाईटवॉश’, दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने हरविण्यासाठी यजमान सज्ज

453
विराट कोहली - 28 कसोटी*

विशाखापट्टनम व पुणे कसोटीत दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घालणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने आता उद्यापासून रांची येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून त्यांना ‘व्हाईटवॉश’ देण्याचे ध्येय बाळगले आहे. तिसऱ्या कसोटी विजयासह 40 गुणांची कमाई करण्यासाठीही यावेळी टीम इंडियाचा संघ सज्ज झाला आहे. अवघ्या चार कसोटींमधून 200 गुणांची कमाई करीत विराट कोहलीची सेना आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या ताजा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेला मात्र अखेरची कसोटी जिंकून शेवट गोड करण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे.

सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये

हिंदुस्थानचे बहुतांशी खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतही या संघाचा विजय निश्चित समजला जात आहे. मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्या बॅटमधून धावाच धावा निघाल्या आहेत. मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, रवींद्र जाडेजा, रवी अश्विन यांनी गोलंदाजीत चमक दाखवलीय. रिद्धिमान साहा याने यष्टीरक्षणात चमक दाखवलीय. आता त्याला फलंदाजीत आपला ठसा उमटवावा लागणार आहे.

कुलदीपऐवजी नदीम

पुणे येथे झालेल्या कसोटीत टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने हनुमा विहारीला वगळून उमेश यादवला संघात स्थान दिले. मात्र रांची येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलदीप यादव जखमी झाल्यामुळे त्याच्याऐवजी शहाबाज नदीम याला संघात स्थान देण्यात आले आहे. प्रत्यक्षात टीम इंडियात कोणाला अंतिम अकरांमध्ये संधी मिळतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नाणेफेकीला कोण येणार?

आशिया खंडात झालेल्या नऊ सामन्यांत फाफ डयुप्लेसिसवर नाणेफेक गमवावी लागण्याची नामुष्की ओढवली आहे. ही मालिका पुढे सुरू राहू नये यासाठी उद्या नाणेफेकीसाठी इतर खेळाडूला पाठवण्याची शक्यता दस्तुरखुद्द फाफ डयुप्लेसिसकडून लढतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त करण्यात आली. उपकर्णधार तेम्बा बवुमा नाणेफेकीसाठी पुढे येऊ शकतो असेही सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

आजपासून तिसरी कसोटी

  • हिंदुस्थान-द. आफ्रिका
  • रांची, सकाळी 9.30 वाजता
आपली प्रतिक्रिया द्या