विंडीज दौर्‍यासाठी हिंदुस्थानी संघनिवड लांबणीवर, धोनीच्या भवितव्याची उत्सुकता

32

सामना प्रतिनिधी । मुंबई

वेस्ट इंडीजविरूद्धच्या दौर्‍यासाठी शुक्रवारी ‘टीम इंडिया’ची निवड करण्यात येणार होती, मात्र अचानक ही निवड पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीचे भवितव्य अन् कर्णधार विराट कोहलीच्या उपलब्धतेबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता पुढील तीन दिवसांत कधीही संघनिवड होऊ शकते.

‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गुरुवारी इंग्लंडहून मायदेशात दाखल झाले. त्यामुळे हिंदुस्थानची संघ निवड पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे. कारण संघ निवडीपूर्वी हे दोन खेळाडू खेळणार की त्यांना विश्रांती हवी आहे हे निवड समितीला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काही जणांच्या मते निवड समितीला धोनीबरोबर त्याच्या निवृत्तीबद्दलही चर्चा करायची आहे. याचबरोबर काही तांत्रिक गोष्टींमुळेही संघनिवड समितीची बैठक पुढे ढकलण्यात असल्याचेही म्हटले जात आहे. बीसीसीआय, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि अन्य काही पदाधिकार्‍यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे निवड समितीची बैठक आता शनिवारी किंवा रविवारी होऊ शकते. मात्र काही जणांच्या मते विंडीज दौर्‍यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा सोमवारीही होण्याची शक्यता आहे.

संघनिवड समितीच्या बैठकीला सीईओला नो एण्ट्री

 ‘बीसीसीआय’चे कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासन समितीने (सीओए) संघनिवड समितीच्या बैठकीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोणताही अधिकारी किंवा बोर्डाचे सीईओ उपस्थित राहू शकत नाही, असे फर्मान ‘सीओए’ने सोडले आहे. संघातील बदलासाठी संघनिवड समितीला ‘बीसीसीआय’चे सचिव व सीईओ यांची परवानगी घेण्याची आता गरज असणार नाही. परदेश दौरा सोडून इतर बैठका घेण्याचा संघनिवड समितीला अधिकार असेल. याचबरोबर प्रशिक्षक निवडीसाठी ‘टीम इंडिया’च्या कर्णधाराची लुडबुड यापुढे चालणार नाही, असेही ‘सीओए’ने स्पष्ट केले आहे.

पंत की धोनी?

‘टीम इंडिया’चा वेस्ट इंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होणार असून या द्विपक्षीय मालिकेत तीन टी-20, तीन वन डे व दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. आगामी वर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला संधी देणार की महेंद्रसिंग धोनीलाच खेळविणार हे बघावे लागेल. विश्वचषक स्पर्धेत शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर रिषभ पंतला पाचारण करण्यात आले होते. पंतने समाधानकारक फलंदाजी करून संघनिवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.

संघाची धुरा कुणाकडे?

दुसरीकडे ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली प्रदीर्घ काळापासून क्रिकेट खेळतोय. त्यामुळे त्याला विश्रांती देऊन रोहित शर्माच्या खांद्यावर ‘टीम इंडिया’ची धुरा सोपविण्याबद्दल चर्चा सुरू होती. जसप्रीत बुमराहलाही विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. मात्र कर्णधारपद जाण्याची कुणकुण लागल्याने विराट वेस्ट इंडीज दौर्‍यावर जाण्यास उत्सुक असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या