सानियाचे स्वप्न भंगले; ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपद

हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे ऑस्ट्रेलियन ओपनचे ग्रॅण्डस्लॅम जिंकून टेनिस विश्वाला गुडबाय करण्याचे स्वप्न भंगले. काही दिवसांपूर्वीच सानियाने व्यावसायिक टेनिसमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर अवघ्या हिंदुस्थानचे लक्ष या सामन्याकडे लागले होते. स्टेफनी आणि माटोस जोडीविरुद्धच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाने पहिल्या सेटमध्ये 6-7 अशी झुंज दिली, पण दुसरा सेट ते 6-2 असे सहज हरले आणि सानियाचे कारकीर्दीचा शेवट ग्रॅण्डस्लॅममय करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया-बोपन्ना जोडीने पहिल्या सेटमध्ये वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटमध्ये या जोडीने 5-3 ने आघाडी घेतली होती, पण त्यानंतर ब्राझिलियन जोडीने जोरदार पुनरागमन केलं. दोन्ही जोडय़ांमध्ये एक-एक पॉइंटसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पहिला सेट  6-6 असा बरोबरीत होता. टायब्रेकरमध्ये सानिया-बोपन्ना जोडी मागे पडली आणि आघाडी असूनही हा सेट जिंकण्यात ते अपयशी ठरले.

पहिला सेट पिछाडीनंतरही जिंकल्यामुळे ब्राझिलियन जोडी जोशात आली. त्यांनी दुसऱया सेटमध्ये हिंदुस्थानी जोडीला वर डोकेच काढू दिले नाही. जिंकणारा पहिला सेट गमावल्यामुळे सानिया-रोहनने दबावाखाली दुसरा सेट सहज गमावला.