अव्वल स्थानासाठी हिंदुस्थानचा ‘विराट’ सराव

32

सामना ऑनलाईन । नागपूर

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा व अंतिम सामना रविवारी नागपूरच्या व्हीसीएच्या मैदानावर रंगणार आहे. चौथ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतरची निराशा झटकून हिंदुस्थान संघातील खेळाडूंनी शनिवारी कसून सराव केला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चौथ्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारल्याने खेळाडूंनी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा सराव जास्त केला.

फोटो : नागपूर सामन्यासाठी हिंदुस्थानी संघाचा सराव

पहिल्या तीन सामन्यात विजयाची हॅट्रिक करत आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावलेल्या हिंदुस्थानला चौथ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे औटघटकेचा ठरलेले पहिले स्थान पुन्हा मिळवण्याची संधी हिंदुस्थानला नागपूरमध्ये मिळणार आहे. सध्या हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेचे समान गुण (११९) आहेत. मात्र दशांश गुणांच्या जोरावर आफ्रिकेने पहिले स्थान पटकावले आहे, तर हिंदुस्थान दुसऱ्या स्थानावर आहे.

तिन्ही प्रकारात अव्वल स्थानाची संधी

हिंदुस्थानकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान पटकावण्याची संधी असणार आहे. कसोटीमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभव केल्यास एकदिवसी क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावेल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यास मर्यादित षटकांच्या प्रकारातही हिंदुस्थान अव्वल स्थानावर येण्याचा पराक्रम करेल.

आपली प्रतिक्रिया द्या