हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची कमाल, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखले

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत शनिवारी सलामीच्या लढतीत यजमान जपानवर सनसनाटी विजय मिळविल्यानंतर रविवारीही कमाल केली. बलाढय़ ऑस्ट्रेलियाला त्यांनी पिछाडीवरून 2-2 असे बरोबरीत रोखण्यात यश मिळविले.

जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानी असलेला हिंदुस्थानच्या महिला संघाने द्वितीय मानांकित ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक खेळावर भर दिला. उभय संघांनी सुरुवातीला तोडीस तोड आक्रमक खेळ करीत पेनल्टीही मिळविल्या, पण गोल करण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले. मात्र, 14व्या मिनिटाला हिंदुस्थानच्या डिफेंडरने अंगाने चेंडू अडविल्याने ऑस्ट्रेलियाला पेनल्टी बहाल केली.

कॅटलिन नोब्सने या पेनल्टीवर अचूक गोल करीत ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. वंदना कटारियाने 36व्या मिनिटाला बरोबरीला गोल करीत हिंदुस्थानवरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला, पण ही बरोबरी फार काळ टिकली नाही. ग्रेस स्टीवर्टने 43व्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाला पुन्हा 2-1 असे आघाडीवर नेले. 59व्या मिनिटाला हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ड्रग-फ्लिकर गुरजित कौर हिने मिळालेल्या संधीवर अचूक गोल करून सामना बरोबरीत सोडविला.

पुरुष संघाची न्यूझीलंडविरुद्ध हार
मलेशियाचा 6-0 गोल फरकाने धुव्वा उडवून ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेची खणखणीत सुरुवात करणाऱया हिंदुस्थानच्या पुरुष संघाला दुसऱया लढतीत न्यूझीलंडविरुद्ध 1-2 अशी हार पत्करावी लागली. हिंदुस्थानचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱयाच मिनिटाला गोल करून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली होती. मात्र, अखेरच्या चौथ्या क्वार्टरमध्ये जेकब स्मिथने 47व्या, तर सॅम लॅन याने 60व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानच्या हातातून विजय हिरावून नेला. क्रमवारीत हिंदुस्थानचा संघ पाचव्या, तर मलेशियाचा संघ आठव्या स्थानी आहे. त्यामुळे आघाडीवर असताना अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन गोल स्वीकारणे हे हिंदुस्थानी संघासाठी लाजिरवाणी घटना होय.

आपली प्रतिक्रिया द्या