हिंदुस्थान ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या उद्रेकातून बाहेर पडेल; अहवालातील माहिती

1387

जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत हिंदुस्थान तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोना कधी संपुष्टात येणार असा सवाल उपस्थित येत आहे. हिंदुस्थानात जुलै महिन्यात कोरोनाचा उद्रेक होईल, असा अंदाज अहवालातून वर्तवण्यात आला होता. आता ऑगस्ट महिन्यात हिंदुस्थानला कोरोनाच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा अंदाज टाइम्स फॅक्ट-इंडिया आउटब्रेक अहवालात नमूद करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढतील आणि या काळात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असेल असे नमूद करण्यात आले आहे. तसेच ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हिंदुस्थान कोरोनाच्या या उद्रेकातून बाहेर पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या अहवालानुसार 21 ऑगस्ट रोजी देशात 6.5 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ यासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून कोरोनाव्हायरस साथीच्या फैलावीचा अभ्यास करत टाइम्स फॅक्ट-इंडिया आउटब्रेक अहवालात देशातील कोरोना फैलावाबाबतचे नवे अंदाज जाहीर केले गेले आहेत. त्यात देशात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आणि कोरोना उद्रेकातून बाहेर पडण्याच्या कालावधीची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकावर हिंदुस्थान आहे. देशात 21 ऑगस्ट रोजी 6.5 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असतील, अशी शक्यता अहवालात नमूद केली आहे. तर 23 ऑगस्ट रोजी 6.98 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असण्याचा अंदाज अहवालात नमूद करण्यात आला आहे. गणितीच्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत हिंदुस्थान कोरोनाच्या उद्रेकातून बाहेर पडले, असेही अहवालात म्हटले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करून उद्योगधंदे काही प्रमाणात सुरू होत आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. याआधी एका विश्लेषणाद्वारे हिंदुस्थानात 15 जुलैपर्यंत कोरोनाचा उद्रेक होईल, असा अंदाज होता. आता 21 ऑगस्टपर्यंत कोरोनाचा उद्रेक होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन आणि मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या गोष्टी आवश्यक आहेत.

महाराष्ट्रात अशी असेल परिस्थिती
या अहवालानुसार 1 ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वाधिक 1 लाख 43 हजार 181 अॅक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या अखोरीपर्यंत महाराष्ट्र कोरोनाच्या उद्रेकातून बाहेर पडले असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या ठाण्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. या अहवालानुसार ठाणे जिल्ह्यात 26 जुलैला सर्वाधिक 44 हजार 196 अॅटिव्ह रुग्ण असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 24 सप्टेंबरपर्यंत जिल्हा या परिस्थितीतून बाहेर पडेल. पुणे जिल्ह्यात 29 जुलैला सर्वाधिक 27 हजार 688 अॅक्टिव्ह रुग्ण असतील तर 18 सप्टेंबरपर्यंत रुग्ण संख्या कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या